MeToo: चौकशीसाठी केंद्र सरकार समिती स्थापणार

0
261

सोशल मीडियावरील ‘मी टू’ वादळाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून अशा प्रकरणांची व्यापक चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती आज केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी दिली.

सध्या देशात ‘मी टू’ चळवळ तीव्र झाली आहे. अनेक वर्षांपासून दबलेली लैंगिक अत्याचार व बळजबरीची प्रकरणे चव्हाट्यावर येऊ लागली आहेत. ‘मी टू’ हा हॅशटॅग वापरून पीडित महिला सोशल मीडियावर आपल्या व्यथा मांडत आहेत.

‘मी टू’ मोहिमेअंतर्गत ज्या व्यथा मांडल्या जात आहेत त्यामागील वेदना मी समजू शकते. त्यामुळेच या अंतर्गत समोर येणाऱ्या प्रत्येक प्रकरणाची व्यापक चौकशी व्हावी, असे आम्हाला वाटत असून त्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, असेही मनेका गांधी यांनी नमूद केले. लैंगिक शोषणाशी संबंधित तक्रारींबाबत कायदेशीर तसेच घटनात्मक अंगाने ‘फ्रेमवर्क’ करून त्याद्वारे ही प्रकरणे हाताळण्यात ही समिती मदत करेल, असेही मनेका गांधी यांनी स्पष्ट केले.