ICC क्रमवारीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर

0
225

नुकत्याच झालेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करणारा रोहित शर्मा याने आयसीसी क्रिकेट क्रमवारीत फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या स्पर्धेत रोहितने ३१७ धावा केल्या. त्यामुळे तो दोन पायऱ्या वर चढून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे

या स्पर्धेत ३४२ धावा करणारा शिखर धवन चार पायऱ्या वर चढून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. या दोघांनाही आशिया कपमधील सुपर फोरच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. ही लढत बरोबरीत सुटली होती. पण याच फेरीत पाकिस्तानविरुद्ध दोघांनी केलेल्या २१० धावांच्या भागीदारीचाही त्यांना क्रमवारीत स्थान उंचावण्यास मदत झाली आहे. 

भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने कारकीर्दीतील सर्वोत्तम स्थानावर झेप घेतली आहे. कुलदीप या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान आणि अफगाणिस्तानचा लेगस्पिनर रशिद खान यांच्यासह आशिया कपमध्ये सर्वाधिक १० बळी घेणारे गोलंदाज म्हणून कामगिरी केली होती. रशिद खानने तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर उडी मारली आहे. अफगाणिस्तानचा तो या यादीत अव्वल स्थानावर पोहोचलेला पहिलाच खेळाडू आहे. 

आयसीसीच्या वनडे क्रमवारीत सांघिक कामगिरीत काही बदल झालेला नाही. इंग्लंडने अव्वल स्थान कायम ठेवले असून भारत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, श्रीलंका व वेस्ट इंडिज यांचा क्रमांक लागतो.