Asian Games : नीरज चोप्रा करणार भारतीय संघाचे प्रतिनिधित्व

0
27

गोल्ड कोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील यशानंतर सर्व भारतीय खेळाडूंना वेध लागले आहेत ते आशियाई खेळांचे. या वर्षीच्या आशियाई स्पर्धेमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

१८ व्या आशियाई स्पर्धेमध्ये नीरज चोप्रा उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक म्हणून दिसणार आहे. भारतीय ऑलम्पिक संघाचे (आईओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी आज ही घोषणा केली. आशियाई स्पर्धा १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेमबांग येथे होणार आहे.

नीरज चोप्राने २०१६ मध्ये आईएएफ विश्व अंडर २० चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. २०१४ च्या आशियाई स्पर्धेत भारताचे माजी हॉकी कर्णधार सरदार सिंह ध्वजवाहक होते. कोरियाच्या इंचियोनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने ११ सुवर्ण, १० रौप्य आणि ३६ कांस्य पदकासह एकूण ५७ पदकांची कमाई केली होती. तर भारताने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये एकूण १०१ पदकांची कमाई केली होती. तर २००२मध्ये मँचेस्टर येथील स्पर्धेमध्ये ६९ पदके मिळवली होती.