२०१७ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

0
40

अमेरिकेतील प्रख्यात अनुवंशशास्त्रज्ञ जेफरी सी. हॉल, मायकेल रोसबाश आणि मायकेल डब्ल्यू. यंग यांना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. बहुतांश सजीव प्राणिमात्रांच्या झोपण्याचे आणि जागे होण्याचे चक्र हाताळणार्‍या जैविक घडाळ्यावर मोलाचे संशोधन केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

बायोलॉजिकल क्लॉकवर जेफरी सी. हॉल, मायकेल रोसबाश आणि मायकेल डब्ल्यू. यंग या  संशोधकांनी अभूतपूर्व काम केले आहे. ही क्लॉक नेमकी कशी काम करते आणि त्यांचे संशोधन नेमके काय होते याची संक्षिप्त माहिती जाहीर करण्यात आली आहे. या तिन्ही संशोधकांना नोबेल अकॅडमीने वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल जाहीर केला. तिन्ही संशोधकांना ९० लाख स्वेडिश क्रोनर (जवळपास ७ कोटी २० लाख रुपये) एवढी पुरस्कार राशी देखील दिली जाणार आहे.

सजीवांमधील दैनंदिन प्रक्रियांचे अंतर्गत चक्र या क्षेत्रात या तिघांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. या घड्याळरूपी चक्रामुळे सजीवांमधील झोपेचे प्रकार, खाण्यापिण्याच्या पद्धती, हार्मोन्सची निर्मिती आणि रक्तदाब यांचे नियमन होते, हे त्यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे. सजीवांमधील हे अंतर्गत घड्याळ आणि बाह्य वातावरण यांच्यात बदल झाल्यास त्याचा सजीवांवर परिणाम होतो. यासाठी उदाहरणादाखल त्यांनी एखादे जेट विमान जोराचा आवाज करीत आपल्या डोक्यावरून गेल्यानंतर होणार्‍या अवस्थेचा दाखला दिला. या तिन्ही शास्त्रज्ञांच्या पथकाने सजीवांमधील अंतर्गत घडाळ्यातील विविध प्रकारचे जनुक आणि प्रथिनांचा शोध लावला. हॉल हे निवृत्त झाले असले, तरी ते अजूनही आपला बराच वेळ वालथम येथील ब्रॅण्डिज विद्यापीठातील संशोधनासाठी देतात. रोसबाश हेदेखील याच विद्यापीठात प्राध्यापक आहेत, तर यंग हे न्यू यॉर्क येथील रॉकेफेलर विद्यापीठात संशोधनाचे काम करीत आहेत.

नोबेल पुरस्कार 

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले.