सोळा वर्षीय सौरभ चौधरीला सुवर्ण पदक

0
414

केवळ 16 वर्षे वयाच्या सौरभ चौधरीने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारांत सुवर्णपदक पटकावले.सौरभने आशियाई क्रीडास्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा केवळ पाचवा भारतीय ठरण्याचा मान मिळविला. विशेष म्हणजे वरिष्ठ गटाच्या स्पर्धेत भाग घेण्याची सौरभची ही पहिलीच वेळ आहे.

भारताच्या अभिषेक वर्माने त्याच प्रकारांत कांस्यपदक पटकावून पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारांत भारताला दुहेरी यश मिळवून दिले. तर संजीव राजपूतने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारांत रौप्यपदकाला गवसणी घातलाना आशियाई क्रीडास्पर्धेतील नेमबाजीत भारताची घोडदौड कायम राखली. यंदाच्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताचे हे तिसरे सुवर्णपदक ठरले. याआधी बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी भारताला कुस्तीत सोनेरी यश मिळवून दिले होते.

सौरभने अपेक्षेपलीकडे कामगिरी करताना 240.7 अशा एकूण गुणांसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. जपानच्या जगज्जेत्या टोमोयुकी मात्सुदाला 239.7 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर भारताच्या अभिषेक वर्माने 219.3 गुणांची कमाई करताना कांस्यपदकाची निश्‍चिती केली.