‘लक्ष्य’ला सर्वोत्तम एनजीओचा राष्ट्रीय पुरस्कार

0
15

पुण्यातील लक्ष्य या क्रीडा क्षेत्रासाठी कार्य करणाऱ्या एनजीओला देशातील क्रीडा क्षेत्रासाठीची सर्वोत्तम एनजीओ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

बंगळूर येथे पार पडलेल्या जागतिक सीएसआर दिनानिमित्त राष्ट्रीय सीएसआर लिडरशिप कॉंग्रेसमध्ये झालेल्या एका शानदार समारंभात पुण्यातील लक्ष्य या क्रीडा क्षेत्रासाठी कार्य करणाऱ्या एनजीओला देशातील क्रीडा क्षेत्रासाठीची सर्वोत्तम एनजीओ हा पुरस्कार लक्ष्यला प्रदान करण्यात आला.

मायब्रेन इंटरनॅशनल लिमिटेडचे संचालक ऍलिस्टर स्कोफिल्ड यांच्या हस्ते लक्ष्यचे अध्यक्ष विशाल चोरडिया आणि क्रीडा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभिजित कुंटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी इतर गटातील पुरस्कारही प्रदान करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये सीएसआरमधील सर्वोत्तम संस्था, कॉर्पोरेट कम्युनिकेशन व सौर ऊर्जा, ऊर्जेचा पुनर्वापर व पर्यावरण या पुरस्कारांचा समावेश होता.

क्रीडा क्षेत्रासाठी काहीतरी भरीव कार्य करण्याच्या इच्छेने पुण्यातील हौशी व उत्साही क्रीडा प्रेमींनी भारताला जागतिक क्रीडा विश्वात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी पुण्यामध्ये फेब्रुवारी 2009च्या दरम्यान लक्ष्य या संस्थेची स्थापना करण्यात आली. या “ना नफा, ना तोटा’ तत्वावरील या एनजीओ संस्थेने विविध क्रीडा प्रकारांतील 100 हुन अधिक गुणवान क्रीडापटूंची विविध चाचण्यांमधून निवड करण्यात आली. त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी सर्व बाबतीत त्यांना साहाय्य केले आणि जागतिक स्तरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांचा पाठपुरावा केला. सध्या विविध उद्योगसमूहांच्या साहाय्याने 26 नामवंत क्रीडापटूंना लक्ष्यच्या वतीने सर्वोतोपरी पाठिंबा देण्यात येत आहे. त्यामुळे हे खेळाडू उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत.