राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रेखा शर्मा

0
19

चर्चमधील कबुलीजबाबाची प्रथा बंद करण्यात यावी, असे सुचवल्याने वादास तोंड फोडणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या रेखा शर्मा यांची या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्‍ती करण्यात आली.ललिता कुमारमंगलम यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेंव्हापासून रेखा शर्मा यांच्याकडेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची अतिरिक्‍त जबाबदारी होती.

महिला आयोगाच्या सदस्या म्हणून शर्मा यांनी देशभरातील अनेक मानसोपचार संस्था आणि महिला सुधारगृहांना भेट देऊन तपासणी केली होती. महिलांशी संबंधित या संस्थांमधील महिलांशी त्यांनी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. अलिकडेच चर्चमधील “कन्फेशन’नंतर महिलांना ब्लॅकमेल केले जाण्याचे प्रकरण केरळमध्ये उघडकीस आले आहे. त्या पार्श्‍वभुमीवर “कन्फेशन’ची प्रथा बंद व्हावी असे त्यांनी सुचवले होते.