मोहन जोशी यांना विष्णुदास भावे पुरस्कार

0
33

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते, नाटककार मोहन जोशी यांना जाहीर झाला आहे.

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते, नाटककार मोहन जोशी यांना  जाहीर झाला आहे. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते 5 नोव्हेंबर या रंगभूमी दिनी सांगलीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

विष्णुदास भावे या पुरस्काराचे यंदाचे हे 52 वे वर्ष आहे. मोहन जोशी हे रंगभूमी, चित्रपट, मालिका या क्षेत्रात अनेक वर्षांपासून  काम करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येणार  आहे. विष्णुदास भावे गौरवपदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पंचवीस हजार रुपये   असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मोहन जोशी 

मोहन जोशी यांनी पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरी सुरू असतानाच त्यांचा अभिनयाकडे ओढा वाढला. ‘टूनटून नगरी- खणखण राजा’ या बालनाट्यापासून त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली. पुण्याच्या भरत नाट्य मंदिर संस्थेतर्फे बालनाट्य, एकांकिका, नाटक यामध्ये त्यांनी अनेक पारितोषिके मिळवली. ‘गार्बो’, ‘एक शून्य बाजीराव’ या प्रायोगिक नाटकांत सहभाग घेत ‘मोरूची मावशी’ या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. त्यातून मराठी रंगभूमीला एक विनोदी कलाकार मिळाला. त्यांचे ‘नाथ हा माझा’  हे नाटक खूप गाजले. तेथून त्यांची व्यावसायिक रंगभूमीवर हमखास यश मिळवून देणारा कलाकार अशी नोंद झाली.

‘प्रेमाच्या गांवा जावे’, ‘आसू आणि हासू’ ही त्यांची गाजलेली नाटके. त्यानंतर ते चित्रपट सृष्टीत गेले. तेथेही त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांनी 102 पेक्षा अधिक मराठी चित्रपटात काम केले. ‘भूकंप’ या चित्रपटापासून त्यांनी हिंदी चित्रपटात सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी 172 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटात   भूमिका केल्या आहेत. त्या शिवाय बंगाली, भोजपूरी आणि कन्नड भाषांतील चित्रपटातही भूमिका केल्या आहेत. मराठी आणि हिंदीमध्ये अनेक मालिकांत त्यांचा सहभाग आहे. अभिनयाबरोबर त्यांचे सामाजीक क्षेत्रातही मोठे योगदान आहे.

मैत्री ट्रस्टच्या माध्यमातून वृद्ध, अपंग आणि आजारी कलाकारांना मोठी मदत केली आहे. सध्या ते अखिल भारतीय  मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.

विष्णुदास भावे पुरस्कार

विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून विष्णुदास भावे पुरस्कार देत आली आहे. सांगली येथील ही समिती व राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी ‘ रंगभूमिदिना’ दिवशी हे मानाचे पदक दिले जाते. या पुरस्काराचे स्वरूप – मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्‍या ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबईतील संस्था वर्षातील उत्कृष्ट हिंदी नाट्यरचनेसाठी विष्णुदास भावे पुरस्कार देते.