मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’

0
10

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) स्वच्छता मोहीम राबविली. त्यांनी साफसफाई कर्मचाऱ्यांशी आणि रुग्णालयात दाखल मुलांशीही संवाद साधला. निमित्त होते ‘सेवा सप्ताहा’च्या प्रारंभाचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबरला वाढदिवस निमित्त शनिवारपासून सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे.

त्या निमित्ताने वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, प्लास्टिकमुक्तीचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. हे अभियान २० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पक्षकार्यकर्ते आणि सरकारांनीही जनतेच्या सेवेसाठी उपक्रम आयोजित करावेत.दरम्यान, २०१४पासून सरकार स्थापन झाल्यानंतर मोदींचा वाढदिवस अशाच प्रकारे साजरा केला जात आहे.

पंतप्रधानांना गेल्या वर्षभरात भेट म्हणून मिळालेल्या सुमारे २७०० वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावातून जमा होणारी रक्कम ‘नमामि गंगे’ प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. पंतप्रधानांना मिळालेल्या या वस्तूंमध्ये शाली, पगड्या, जॅकेट, स्मृतिचिन्हे यांचा समावेश आहे. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे शनिवारी, ३ ऑक्टोबरला हा लिलाव होणार आहे. त्यात भाग घेण्यासाठी www.pmmementos.gov.in या वेबसाइटवर नावनोंदणी करता येईल. स्मृतिचिन्हांसाठी २०० रुपयांपासून अडीच लाख रुपयांपर्यंत किंमत अपेक्षित आहे.