माजी मंत्री आनंदराव देवकते यांचे निधन

0
193

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी दुग्ध विकास व पशु संवर्धन मंत्री आनंदराव देवकते यांचे आज सायंकाळी साडेपाच वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

ते ८६ वर्षांचे होते. देवकते यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता राजूर (दक्षिण सोलापूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

१९५५ मध्ये गोवामुक्ती संग्रामात सहभाग घेणारे आनंदराव देवकते काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यांचा राजूरचे सरपंच ते राज्याचे मंत्री, असा राजकीय प्रवास थक्क करणारा होता. काँग्रेस पक्षात त्यांनी विविध पदांची धुरा यशस्वीपणे सांभाळली व संघटनेच्या बांधणीसाठी मोलाचे योगदान दिले. १९७८ पासून सलग २५ वर्षे त्यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभेवर प्रतिनिधीत्व केले. १९९९ ते २००३ यादरम्यान विलासराव देशमुख सरकारमध्ये ते दुग्धविकासमंत्री होते. त्यांनी महानंदचे अध्यक्षपदही भूषविले होते. 

२००३ मध्ये काँग्रेस हायकमांडने विलासराव देशमुख यांना पदावरून दूर करून केंद्रात मंत्री असलेले सुशीलकुमार शिंदे यांना महाराष्ट्रात धाडले व त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. तेव्हा आनंदराव देवकते यांनी मंत्रिपद आणि आमदारकीचा राजीनामा देऊन सुशीलकुमारांसाठी आपला मतदारसंघ सोडला होता. दरम्यान, सुशीलकुमार यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पक्षाने देवकते यांना उमेदवारी दिली मात्र प्रतापसिंग मोहिते-पाटील यांनी धक्कादायकरित्या देवकते यांचा पराभव केला. या पराभवानंतर देवकते यांच्या राजकीय प्रवासालाही उतरती कळा लागली. मात्र देवकते यांची पक्षावरील निष्ठा ढळली नाही.