महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार

0
40

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी माजी फिरकीपटू रमेश पोवार यांची BCCIकडून नियुक्ती करण्यात आली आहे. निर्धारित षटकांच्या सामन्यासाठी असलेल्या संघाचे प्रशिक्षकपद पोवार यांना देण्यात आले आहे. या पदासाठी मुंबईत अनेक जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

भारताचे माजी यष्टीरक्षक अजय रात्रा, विजय यादव, माजी कर्णधार ममता माबेन, सुमन शर्मा हे अन्य क्रिकेटपटूदेखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते. तसेच दोन कसोटी आणि ५१ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असलेली न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटपटू मारिया फाहेने यांनी सुद्धा या पदासाठी अर्ज केला आहे. ३४ वर्षीय मारिया या गुंटूर येथील आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अकादमीत प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

तुषार आरोठे यांनी वादग्रस्त पद्धतीने प्रशिक्षकपद सोडल्यानंतर दोन कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असलेले पोवार यांना या संघाचे प्रभारी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. विश्वचषक स्पर्धेनंतर आरोठे आणि संघातील वरिष्ठ खेळाडूंमधील मतभेद वाढले होते. त्यामुळे आरोठे यांना प्रशिक्षकपद सोडावे लागल्यानंतर बीसीसीआयकडून या पदासाठी अर्ज मागवण्यात आले होते.