महाराष्ट्रातील वृक्षलागवडीची ‘लिमका’ हॅटट्रिक

0
15

महाराष्ट्रातील वृक्षलागवडीची मोहिमेची सलग तिसऱ्यांदा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. २०१८मध्ये करण्यात आलेल्या तेरा कोटी वृक्षलागवडीसाठी वन विभागाला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत वन विभागाने लोकसहभागातून तेरा कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात राज्यात १५ कोटी ८८ लाखांहून अधिक वृक्षलागवड झाली. सुमारे ३८ लाख लोकांनी या वृक्षलागवडीत सहभागी घेतला होता. १ लाख ४५ हजार ६८३ जागांवर ही वृक्षलागवड करण्यात आल्याची वनखात्याकडे नोंद करण्यात आली होती.  यासंबंधीचे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसचे प्रमाणपत्र वन विभागास नुकतेच मिळाले आहे. वृक्षलागवडीसाठी तीन आणि कांदळवनाच्या मोहिमेसाठी एक अशी चार लिमका बुक ऑफ रेकॉर्डसची प्रमाणपत्रे वन विभागाला मिळाली आहेत. 

यापूर्वी राज्यास ४ कोटी वृक्षलागवडीसाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसचे प्रमाणपत्र प्राप्त झाले होते. १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत लोकसहभागातून ५ कोटी ४३ लाखांहून अधिक वृक्षलागवड झाली होती. ९४ हजार २५७ ठिकाणी ही रोपे लावण्यात आली होती. यात सोळा लाख लोक सहभागी झाले होते आणि १८५ प्रजातींची झाडे त्यात लावली गेली होती. २०१६ मध्ये १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी २ कोटी ८१ लाखांहून अधिक वृक्षलागवड करण्यात आली. यात सहा लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते व ६५ हजार ६७४ ठिकाणी १५३ प्रजातींची रोपे लावण्यात आली होती. १२ तासात झालेल्या या वृक्षलागवडीस ही लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राप्त झाले होते. 

यंदा राज्यात जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत लोकसहभागातून ३३ कोटी वृक्षलागवड करण्यात येते आहे. आजपर्यंत राज्यात २९ कोटी १८ लाख ८५ हजार १६७ वृक्षलागवड झाली आहे. यात ८४ लाख १८ हजार ३५५ लोकांनी सहभाग नोंदवला आहे.