भारत-नॉर्डिक शिखर परिषद

0
24

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत स्‍वीडनची राजधानी स्‍टॉकहोममध्ये प्रथम ‘भारत-नॉर्डिक शिखर परिषद’ यशस्वीरित्या पार पडली. भारत-नॉर्डीक द्वैपक्षीय संबंधांतून अनेक करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या.

स्वीडन, नॉर्वे, फिनलँड, डेन्मार्क आणि आइसलँड या देशांना सामूहिक रूपात नॉर्डिक देश म्हणून ओळखले जाते. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर दोन्ही बाजूंमधील द्वैपक्षीय संबंधांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रात अनेक करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.

भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये झालेले करार –

भारत आणि डेन्मार्क

  • शाश्वत आणि स्मार्ट शहरी विकास क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
  • पशुपालन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
  • अन्न सुरक्षा क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
  • भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि डेन्मार्कचे कोपनहेगन विद्यापीठ यांच्यात कृषी संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार

भारत आणि स्वीडन

  • भारत आणि स्वीडन यांच्यात शाश्वत भविष्यासाठी ‘भारत-स्वीडन अभिनवता भागीदारी (India-Sweden Innovation Partnership)’ याचे संयुक्त घोषणापत्र  

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि आइसलँड

  • भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि आइसलँड विद्यापीठ यांच्यात हिंदी भाषेसाठी ICCR अध्यक्षपद स्थापन करण्यासंबंधी सामंजस्य करार

ठळक मुद्दे

  • नॉर्डिक देशांसह भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) अधिक प्रतिनिधीक, उत्तरदायी, प्रभावी आणि प्रतिसादात्मक बनविण्यासाठी त्यांच्या कायमस्वरुपी आणि तात्पुरत्या जागांमधील विस्तारांसह UNSCच्या संरचनेत सुधारणांची आवश्यकता पुन्हा एकदा व्यक्त केली. भारताला UNSC मध्ये कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे या मुद्द्याला नॉर्डिक देशांचा पाठिंबा मिळाला.
  • स्वच्छ ऊर्जा यंत्रणा, नवीकरणीय ऊर्जा आणि इंधन, वाढीव ऊर्जा कार्यक्षमता आणि स्वच्छ ऊर्जेच्या निर्मितीसाठी तंत्रज्ञानांचा विकास करण्यासाठी प्रयत्न चालू ठेवण्यास सहमती दर्शविण्यात आली आहे.
  • स्वीडन सरकार स्मार्ट शहरे आणि शाश्वतीकरण क्षेत्रात $5.9 कोटींचा निधी जाहीर केला. हा निधी भारतासह अभिनवता क्षेत्रात सहकार्य चालविण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे.