भारतीय महिला क्रिकेट संघाचे हरमनप्रीत कौरकडे नेतृत्व

0
202

नोव्हेंबर महिन्यात कॅरेबियन बेटांवर होणाऱ्या महिला टी-20 विश्‍वचषकासाठी बीसीसीआयने भारतीय महिला संघाची घोषणा केली असून 15 सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपविण्यात आले आहे. महाराष्ट्राची स्मृती मंधाना संघाची उपकर्णधार असणार असून या संघात मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्जलाही संधी मिळाली आहे. 9 ते 24 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.

भारतीय संघाचा या स्पर्धेत ब गटात समावेश करण्यात आला असून या गटात भारतीय महिलांना ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड या संघांचा सामना करावा लागेल. स्पर्धेत भारतीय महिलांचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध 9 नोव्हेंबर रोजी होणार असून दुसरा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी तिसरा सामना आयर्लंडविरुद्ध 15 नोव्हेंबरला, तर चौथा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

महिला विश्‍वचषकासाठी भारतीय महिला संघ- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), मिताली राज, जेमिमा रॉड्रिग्ज, वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिश्‍त, हेमलता, मानसी जोशी, पूजा वस्त्रकार व अरुंधती रेड्डी.