भारताचे दलवीर भंडारी आयसीजेच्या न्यायाधीशपदी

0
20

भारताचे दलवीर भंडारी यांचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटनने क्रिस्टोफर ग्रीनवुड यांचे नामांकन मागे घेतल्याने भंडारी यांची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भंडारी यांची ही दुसरी टर्म आहे.

भारताचे दलवीर भंडारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीशपदी 

न्यायमूर्ती भंडारी यांच्या या निवडीमुळे पाकच्या कैदेत असणार्‍या कुलभूषण जाधव प्रकणातही भारताला फायदा होणार आहे. याप्रकरणी आता आंतरराष्‍ट्रीय न्यायालय काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. पाकमधील लष्‍करी न्यायालयाने कुलभूषण यांना शिक्षा सुनावल्यानंतर आंतरराष्‍ट्रीय न्यायालयाने हस्‍तक्षेप करून शिक्षेला स्‍थगिती दिली होती. हा निर्णय देणार्‍या आंतरराष्‍ट्रीय न्यायालयाच्या १५ न्यायाधीशांमध्ये भारताचे न्यायमूर्ती भंडारी हेही होते. 

दलवीर भंडारी 

# आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी दुसर्‍यांदा निवड झालेले पद्मभूषण दलवीर भंडारी यांनी भारतीय न्‍यायव्‍यवस्‍थेत ४० वर्षापेक्षा अधिक काळ सेवा बजावली आहे. कधी वकील, तर कधी उच्च न्‍यायालयाचे न्‍यायाधीश, तर कधी सर्वोच्च न्‍यायालयाचे न्‍यायाधीश अशा पदांवर त्यांनी कार्य केले आहे. 

# दलवीर भंडारी यांचा जन्म १ऑक्टोबर १९४७ रोजी झाला. राजस्थानमधील जोधपूर विद्यापीठातून त्यांनी मानव्यशास्त्र आणि कायद्याची पदवी घेतली. भारतामधील शिक्षण पूर्ण केल्यानंतर न्‍यायाधीश दलवीर भंडारी यांनी अमेरिकेतील शिकागोमधील नॉर्थ वेस्‍टर्न विद्यापीठातून कायद्यातील पदव्युत्तर पदवी प्राप्‍त केली. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यास केला. 

# न्यायमूर्ती भंडारी यांनी १९७३ ते १९७६ पर्यंत राजस्‍थानमधील उच्च न्‍यायालयामध्ये वकिली केली. त्यानंतर दिल्‍ली उच्च न्‍यायालयाचे न्यायाधीश म्‍हणून विराजमान होईपर्यंत त्यांनी दिल्‍लीमध्ये वकिली केली. दिल्‍ली उच्च न्‍यायालयाचे न्‍यायाधीश झाल्यानंतर भंडारी यांची मुंबई उच्‍च न्यायालयाच्या मुख्य न्‍यायाधीशपदी नियुक्‍ती झाली. त्यानंतर २००५ मध्ये न्यायमूर्ती भंडारी हे सर्वोच्‍च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. 

# २०१२ मध्ये सर्वोच्‍च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांना भारताकडून आंतरराष्‍ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्‍हणून नामांकन मिळाले. आणि त्यांची मताधिक्‍क्याने हेग स्‍थित आंतरराष्‍ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्‍हणून निवड झाली. यावेळी भंडारी यांना संयुक्‍त राष्‍ट्रसंघातील १९३ पैकी १२२ देशांचा पाठिंबा मिळाला होता. त्यांहा हा कार्यकाल फेब्रुवारी २०१८ मध्ये संपत आहे.