बंगळुरूत साकारणार पहिलं ‘आधार प्रणालीयुक्त विमानतळ

0
15

बंगळुरूत देशातील पहिले ‘आधार’ विमानतळ सुरू होत आहे. फक्त हात दाखवला की लगेचच तुम्ही विमानतळावर प्रवेश करू शकता.

ओळखपत्र, पासपोर्ट वगैरे कागदपत्रे दाखवून विमानतळावर प्रवेश मिळविणे आता बंद होणार आहे. बंगळुरूत देशातील पहिले ‘आधार’ विमानतळ सुरू होत आहे. फक्त हात दाखवला की लगेचच तुम्ही विमानतळावर प्रवेश करू शकता. लवकरच हिंदुस्थानातील विविध विमानतळांवर आधारकार्डावर आधारित बायोमेट्रिक बोर्डींग सिस्टीम बसविण्यात येणार असून याची सुरुवात पुढील वर्षी बेंगळुरू येथील कॅम्पेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून करण्यात येणार आहे.

या विमानतळामुळे प्रवाशांची जागोजागी चेकपॉइंटवर आयडी व बोर्डिंग पास दाखवण्याची कटकट संपणार आहे. तसेच प्रवाशांचा वेळसुद्धा वाचणार आहे. खरं तर विमानतळांची सुरक्षा वाढवण्यासह प्रवाशांचा प्रवेश सुकर होण्यासाठी आता आधार बेस प्रवेशाला चालना देण्यात येत आहे. बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टीमनं तयार झालेलं बंगळुरूतील केआयए विमानतळ हे देशातील पहिलं आधार बेसद्वारे प्रवेश देणारं विमानतळ असणार आहे. सध्या इथे पायलट प्रोजेक्टही सुरू आहे.

बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड(बीआयएएल)द्वारे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, मार्च 2018पर्यंत विमानतळावरील प्रवेशावर आधार व बायोमेट्रिक सिस्टीम लागू करण्यात येणार आहे. डिसेंबर 2018पर्यंत विमानतळ पूर्णतः आधार सिस्टीमनं युक्त करण्यात येणार आहे. बीआयएएलनुसार, विमानतळावर जागोजागी चेकपॉइंटवर प्रवाशांचा जवळपास 25 मिनिटांचा वेळ खर्ची पडतो. मात्र आधार आधारित प्रणालीमुळे ही सर्व प्रक्रिया केवळ 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे बोर्डिंग गेटच्या आधी प्रत्येक चेकपॉइंटवर फक्त पाच सेकंदच पडताळणी होणार आहे. तसेच ही प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर सर्वाधिक प्रवासी एकाच गेटमधून प्रवेश घेऊ शकणार आहेत.

या प्रक्रियेमुळे पडताळणी करणंही सोपं जाणार आहे. तसेच सुरक्षेतही पारदर्शकता येणार आहे. बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून पडताळणी करून प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर केला जाणार आहे, अशी माहिती बीआयएएलचे कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष हरी मरार यांनी दिली आहे. तसेच या बायोमेट्रिक प्रणालीमुळे प्रवासी संख्येतही वाढ होणार आहे. बीआयएएलनं ही नवी प्रणाली बसवण्यासाठी 325 दिवसांची मुदत निश्चित केली आहे. मार्च 2018पर्यंत विमानतळांवर आधार आधारित प्रवेश सुरू करण्यात येणार आहे.