‘पोषण माह’ अभियानांतर्गत महाराष्ट्राला १४ पुरस्कार प्रदान

0
238

गरोदर माता, स्तनदा माता यांना सकस आहार घेण्याबाबत तसेच राज्यातील बालकांमधील कुपोषणाबाबत जागरूकता, मुलींचे पोषण व त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता करण्याबाबत ‘पोषण माह’ कार्यक्रमामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी आज महाराष्ट्राला एकूण १४ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

‘पोषण माह’ अंतर्गत महाराष्ट्रात असे कार्यक्रम राबविण्यात आले

‘गोदभरायी’ या उपक्रमातून गरोदर मातेची सातव्या महिन्यात ओटी भरणे व या महिलांना आहार विषयक मार्गदर्शन करण्यात आले. ‘अन्नप्राशन’ उपक्रमाद्वारे सहा महिन्याच्या बालकांपासून बालकांचा आहार कसा असावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांची थायरॉईड व हिमोग्लोबिनची चाचणी घेण्यात आली. मुलींना स्वच्छता व आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक अंगणवाडी केंद्रात ‘अक्षयपात्र’ हा उपक्रम राबविण्यात आला, या अंतर्गत महिलांचे प्रबोधन करून अंगणवाडी केंद्रातील मुलांच्या आहारात विविधता येण्यासाठी कांदे, बटाटे, कडीपत्ता, शेवग्याचा पाला आदी त्यांना अंगणवाडी केंद्रात आणण्यास सांगण्यात आले व या केंद्रातील आहारात त्याचा अंतर्भाव करण्यात आला. पोषण आहाराबाबत जागरूकता करण्यासाठी मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली, फॅन्सी ड्रेस स्पर्धा रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रीय पोषण माह अभियानात उत्कृष्ट कार्यासाठी सर्वाधिक पाच वैयक्तिक पुरस्कार एकट्या कोल्हापूर जिल्ह्याला प्रदान करण्यात आले. राज्यात जिल्हा स्तरावर उत्तम सांघिक कार्यासाठी चंद्रपूर व नाशिक जिल्ह्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. 

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या पोषण अभियान विभागाच्या वतीने देशभरातील ३६ जिल्हे व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘सप्टेंबर २०१८’ हा पोषण महिना म्हणून साजरा करण्यात आला. यात अगदी गाव पातळीपासून गरोदर माता, स्तनदा माता यांना सकस आहार, लहान मुलांमधील कुपोषणाबाबत जागरूकता, मुलींचे पोषण व त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता आदी विषयांवर पोषण अभियानाबाबत जागरूकता कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमांची नोंद पोषण अभियानाच्या संकेतस्थळावर करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्यासाठी देशभरातील विविध राज्यांना क्षेत्रीय स्तरावर वैयक्तिक आणि जिल्हा स्तरावर सांघिक असे पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राचाही यावेळी सन्मान करण्यात आला.