चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत नाही, त्या भागात यान उतरवून चीनने आज इतिहास घडविला. या भागात यान उतरविणारा चीन हा पहिलाच देश ठरला आहे. चीनने आवकाशयान “चांग इ-4′ ने स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजून 26 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर स्पर्श केला. लगेचच त्याने छायाचित्रे पाठविण्यासही सुरवात केली आहे. या यानात एक बग्गीही आहे. पृथ्वीवरून चंद्राचा जो भाग कधीच दिसत नाही, अशा भागत ये यान उतरविण्यात आले आहे. या भागाची माहिती मिळविण्यासाठी या मोहिमेचा उपयोग होणार आहे.
रशियाने 1959मधील मोहिपासून चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे विविध अवकाशयानांनी काढली आहेत. पण, प्रत्यक्ष त्या भागात उतरून घेतलेली छायाचित्रे आता प्रथमच मिळणार आहेत. चंद्रावर यान उतरविण्याची मोहीम यापूर्वी रशिया व चीन अशा दोन देशांनीच यशस्वी केली आहे.
“चांग इ-4′ यान “लॉंग मार्च-3बी’ या प्रक्षेपकाद्वारे 8 डिसेंबर रोजी सिचुआन प्रांतातील शिचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील व्होन कारमन या भागात हे यान उतरले आहे. उतरत असताना तेथील पृष्ठभागाची छायाचित्रे “चांग ई-4’ने पाठविली आहेत. चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास लागणारा वेळ हा पृथ्वीच्या भोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळाएवढाच असल्यामुळे चंद्राची कायम एकच बाजू पृथ्वीच्या दिशेला असते. चंद्राच्या दुसऱ्या बाजूची छायाचित्रे ही सर्वप्रथम लूना 3 या अंतराळयानाने 1959मध्ये घेतली.
असे आहे यान
– मुख्य यानाचे वजन ः 1088 किलो
– बग्गीचे वजन – 136 किलो
यांचा अभ्यास करणार
– चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान तपासणार
– तेथील खडक आणि मातीच्या नमुन्यांची रासायनिक रचना पाहणार
– वैश्विक किरणांचा अभ्यास
– सूर्याच्या प्रभामंडळाचा अभ्यास