‘नासा’ची पहिली सूर्य मोहिम सुरू

0
58

मेरिकेची अंतराळ संशोधन संस्था “नासा’च्या पहिल्यावहिल्या सूर्य मोहिमेला आज पहाटे यशस्वी सुरुवात झाली. नासाच्या “पारकर सोलर प्रोब’ असे या मोहिमेचे नाव आहे. या महत्वाकांक्षी मोहिमेचा कालावधी सात वर्षांचा असेल.

सूर्यावरील तत्प वातावरण आणि सौर वादळांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ही मोहिम आखली गेली आहे. अमेरिकेतील केप कानावेरल एअर फोर्स स्टेशनमधून पहाटे 3 वाजून 31 मिनिटांनी “युनायटेड लॉंच अलायन्स डेल्टा 4’हे अवकाश यान सूर्याच्या दिशेने झेपावले. हे अवकाश यान कालच अंतराळात उड्डाण करणार होते. मात्र ऐनवेळी झालेल्या हवामानातील बदलांमुळे हे उड्डाण पुढे ढकलण्यात आले होते.युगेज एन पारकर या 91 वर्षीय खगोल शास्त्रज्ञाने 1958 साली सर्वप्रथम सौर वायुझोतांबाबत भाकित वर्तवले होते. त्यामुळे या मोहिमेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. “नासा’च्या केनेडी स्पेस सेंटरमधून या अवकाश यानाचे प्रक्षेपण पाहण्यासाठी स्वतः पारकर उपस्थित होते. या अवकाश यानावर पारकर यांचेच “लेट्‌स सी व्हॉट्‌स लाईज अहेड’ हे शब्द लिहीलेले आहेत. याशिवाय सूर्यावर प्रवास करू इच्छिणाऱ्या सुमारे 11 लाख खगोलप्रेमींची कार्डेही या अवकाश यानात आहेत.

सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करून तेथील वातावरणाबाबत अंदाज वर्तवण्यासाठी हा अभ्यास विशेष महत्वाचा ठरणार आहे. सूर्याच्या वातावरणातील सौर वादळांमुळे पृथ्वीच्या वातावरणात सोडलेले सॅटेलाईट आणि अवकाशात गेलेल्या अंतराळवीरांना इजा पोहोचू शकत असते.ही मोहिम केवळ सूर्याच्या किती जवळ जाता येऊ शकते, हे पाहण्यासाठीच नाही. तर आपले ब्रम्हांड अधिक व्यवस्थित समजून घेण्यासाठी आहे, 

आपल्या प्रवासाच्या पहिल्या आठवड्यात अंतराळ यान आपल्या उच्चशक्तेशाली ऍन्टेना आणि मॅग्नेटोमीटर कार्यान्वित करेल. त्यानंतर यानातील सामुग्रीची चाचणी सप्टेंबरच्या पूर्वार्धात सुरू होईल. ही चाचणी अंदाजे चार आठवडे चालेल. त्यापुढील दोन महिने शुक्रावरील आकर्षणाच्या आधारे ऑक्‍टोबरपर्यंत पारकर सोलर प्रोब शुक्र ग्रहाच्या दिशेने प्रवास करेल. याच काळात यानावरील ब्रेकचा वापर केला जाईल. नोव्हेंबरच्या सुरुवातीला सूर्यापासून 15 दशलक्ष मैल इतक्‍या अंतरावर यान पोहोचलेले असेल. उआच वातावरणाला कोरोना असे म्हणतात. यापुढे मानवनिर्मित काहीही आतापर्यंत जाऊ शकलेले नाही. डिसेंबरमध्ये हे यान पहिले निरीक्षण नोंदवेल. 

सात वर्षांच्या या प्रवासादरम्यान शुक्राभोवती 6 वेळा आणि सूर्याभोवती एकूण 24 प्रदक्षिणा पूर्ण करेल. सूर्यापासून 3.8 दशलक्ष मैलांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी हे यान अंदाजे ताशी 7 लाख किलोमीटर वेगाने प्रवास करेल. मानवाने निर्मिती केलेल्या कोणत्याही वस्तूचा हा सर्वाधिक वेग असेल. सूर्याच्या सर्वाधिक निकट गेल्यावर तेथे 1.377 अंश सेल्सिअस इतक्‍या तापमानाला या यानाला सामोरे जावे लागणार आहे. 4.5 इंच जाडीच्या कार्बन कॉम्पोजिट शील्डपासून हे यान आणि त्यातील सामुग्री सुरक्षित केलेली असेल.