डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

0
350

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये शासनामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंन योजना ही शेतकऱ्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी उपयुक्त आहे. या योजनेचे उद्दिष्ट अनुसूचित जाती/ नवबौद्ध शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देणे हे आहे.

अनूसूचित जाती/ नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सन 1982-83 पासून राबविण्यात येत असलेली विशेष घटक योजना बदललेल्या परिस्थितीची गरज विचारात घेऊन जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या नावाने सन 2016-17 पासून राबविण्यात येत आहे.

 

योजनेअंतर्गत खालील घटकांसाठी त्यापुढे नमूद रकमेच्या मर्यादेत अनुदान देण्यात येते.

 

नवीन विहीर-  उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- 250,000/-,

जुनी विहीर दुरुस्ती-  उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- 50,000/-,

इनवेल बोअरिंग –  उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- 20,000/-,

पंप संच-  उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- 25,000/-, 

वीज जोडणी आकार-  उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- 10,000/-,

शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण-  उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)- 1,00,000/-,

सूक्ष्म सिंचन संच-  उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)-  ठिबक -50,000/-, तुषार-25,000/-

 

या योजनेंतर्गत वरील 7 बाबी असून लाभ पॅकेज स्वरुपात द्यावयाचा आहे. खालीलपैकी एका पॅकेजचा लाभ लाभार्थीस अनुज्ञेय राहील. नवीन विहीर :-  नवीन विहीर,  पंप संच,  वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज – जुनी विहीर दुरुस्ती, पंप संच,  वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग बाब : – शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण- उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)-  ठिबक -50,000/-, तुषार- 25,000/- शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेज : शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, पंपसंच, वीजजोडणी आकार व सूक्ष्म सिंचन संप ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच शासकीय योजनेतून विहीर घेतली असेल किंवा स्वखर्चाने विहीर बांधली असेल अशा शेतकऱ्यांना पंपसंच, वीजजोडणी आकार व सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी अनुदान देय राहील.

 

सोलरपंपासाठी अनुदान : जर शेतकऱ्यास महावितरण कंपनीकडून सोलरपंप मंजूर झाला असेल तर पंपसंच व वीजजोडणीसाठी अनुज्ञेय अनुदानाच्या मर्यादेत (रु.35 हजार) लाभार्थी हिस्स्याची रक्कम महावितरण कंपनीस अदा करता येईल.

 

वरील घटकांपैकी लाभार्थ्याकडे काही घटक उपलब्ध असतील तर उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ घेण्यासाठी पुढील आवश्यक घटकांची निवड करावी. पंपसंच, वीजजोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच, लाभार्थी पात्रतेच्या अटी : लाभार्थी हा अनुसूचित जाती/ नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे, शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे, शेतकऱ्याकडे त्याच्या स्वत:चे नावे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहिजे, शेतकऱ्याच्या नावे जमीनधारणेचा 7/12 दाखला व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे, लाभार्थ्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे, लाभार्थ्यांचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डंशी संलग्न असणे आवश्यक आहे, दारिद्रयरेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य, दारिद्रयरेषेखालील नसलेले अनुसूचित जाती/ नवबौध्द शेतकऱ्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न रु. 150,000/- पेक्षा जास्त नसेल तरच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. दारिद्रयरेषेखालील (बीपीएल) यादीत अंर्तभुत शेतकऱ्यांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेची अट नाही. परंतु ज्यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये 1,50,000/- चे मर्यादेत आहे अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसिलदार यांच्याकडून मागील वर्षाचा उत्पन्नाचा अद्ययावत दाखला घेऊन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक  राहील.

 

जिल्हा निवड समिती –  पंचायत समिती स्तरावरुन जिल्हा परिषद कार्यालयास शिफारसीसह प्राप्त होणाऱ्या पात्र अर्जदारांच्या तयार केलेल्या यादीमधून लाभार्थ्याची निवड अंतिम करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षेखाली जिल्हा स्तरावर समिती नियुक्त करण्यात येईल.

 

या योजनांतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना याच आर्थिक वर्षाच्या कालावधीत योजनांतर्गत मंजूर विविध घटकांचा लाभार्थ्यांच्या मागणीनुसार उपलब्ध अनुदान मर्यादेत व प्रती लाभार्थी विहित उच्चतम अनुदान मर्यादेत लाभ द्यावयाचा आहे.

 

योजनेची अंमलबजावणी

 

नवीन विहीर- नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याने यापूर्वी केंद्र/ राज्य/ जिल्हा परिषद निधीतून नवीन सिंचन विहिरीचा लाभ घेतलेला नसावा. तसेच यापूर्वी शासकीय योजनेतून घेतलेल्या व अर्धवट राहिलेल्या अपूर्ण विहिरीचे काम करण्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. लाभार्थ्याच्या 7/12 वर तसेच शेतात प्रत्यक्ष विहीर असल्यास या घटकाचा लाभ घेता येणार नाही. नवीन विहीर घ्यावयाच्या स्थळापासून 500 फुटाच्या अंतरामध्ये दुसरी विहिर नसावी. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्याकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.

 

जुनी विहीर दुरुस्ती : जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जाती/ नवबौद्ध शेतकऱ्यांच्या 7/12 वर विहिरीची नोंद असावी विहिरीच्या कामास उच्चतम अनुदान मर्यादेपेक्षा अधिक रक्कम लागल्यास लाभार्थीने  स्वत: उभी करावयाची आहे.

इनवेल बोअरींग : नवीन विहीर/जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा  लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांने इनवेल बोअरींगची मागणी केल्यास रु. 20 हजाराच्या मर्यादेत अनुदान अनुज्ञेय राहील. इनवेल बोअरींगचे  काम करताना खर्चाचे अंदाजपत्रक व तांत्रिक निकषानुसार  ठिकाणाची  योग्यता (Feasibility Report) भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून प्राप्त करुन घ्यावा.

 

पंपसंच : पंपसंचाच्या लाभासाठी निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी पंपसंच खरेदीकरिता कृषि विकास अधिकारी यांनी पूर्वसंमती घ्यावी. लाभार्थ्यांनी एक महिन्याच्या कालावधीत पंपसंचाची खरेदी करणे आवश्यक राहील अन्यथा अशा शेतकऱ्यांची पूर्वसंमती रद्द करण्यात येईल. केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम संस्थांनी पंपसंचाचे रीतसर तपासणी (testing)  करुन ते सक्षम संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार (standards) असल्याचे प्रमाणित केले असेल त्याच पंपसंचाची पूर्वसंमती प्राप्त लाभार्थी शेतकऱ्याने खरेदी करावयाची आहे.

 

वीज जोडणी आकार : नवीन विहीर पॅकेज/ जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज/ शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेजमधील तथा आवश्यकतेनुसार केवळ वीजजोडणी मागणी करणाऱ्या लाभार्थ्यांने विद्युत वितरण कंपनीकडे कोटेशन भरल्याची पावती कृषि अधिकारी (वि.घ.यो.) पंचायत समिती यांच्याकडे सादर करावी. लाभार्थ्यांनी सादर केलेल्या पावतीनुसार विद्युत वितरण कंपनीकडे खातरजमा करुन कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात कृषि विकास अधिकारी यांनी इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरद्वारे विहित अनुदान मर्यादेत अनुदान वर्ग करण्यात येईल.

 

शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण : ज्या शेतकऱ्यास ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या व डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजनेचे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या अनुसूचित जाती/ नवबौद्ध शेतकऱ्यांना शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण या घटकाचा लाभ घेता येईल.

 

सूक्ष्म सिंचन संच : सूक्ष्म सिंचनासाठी देण्यात येणारे अनुदान हे प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अनुसूचित जाती/ नवबौद्ध शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान म्हणून देण्यात येईल.