ज्येष्ठ लेखिका कृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर

0
24

साहित्य क्षेत्रातील अत्यंत सन्मानाचा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार हिंदी भाषेतील प्रख्यात लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ११ लाख रूपये, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आजवर कृष्णा सोबती यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

# १९८० मध्ये ‘जिंदगीनामा’ या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. १९९६ मध्ये साहित्य अकादमीची फेलोशिपही त्यांना मिळाली. कृष्णा सोबती यांनी लिहिलेल्या ‘जिंदगीनामा’, ‘ऐ लडकी’, ‘मित्रो मरजानी’ यांसारख्या अनेक कादंबऱ्या गाजल्या. हिंदी साहित्यात आपल्या लेखनाची भर घालून ती भाषा समृद्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कल्पना विलास हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

# ‘नफिसा’, ‘सिक्का बदल गया’ ‘बादलोंके घेरे’, ‘बचपन’ या कृष्णा सोबती यांनी लिहिलेल्या लघुकथाही चांगल्याच लोकप्रिय झाल्या. त्या एक व्याख्यात्या आणि भाषांतरकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. २०१० मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्याबाबतही सरकारकडून विचारणा झाली होती मात्र त्यांनी हा पुरस्कार नाकारला. 

‘ज्ञानपीठ’ पुरस्कार : 

ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यजगतात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. भारताचा कोणताही भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. प्रकाशित होऊन कमीतकमी पाच वर्षे झालेल्या पुस्तकांचाच पुरस्कारासाठी विचार होतो. ज्ञानपीठ पुरस्कारात ‘पुरस्कार-पत्र’, ‘वाग्देवीची प्रतिमा’ आणि ‘दहा लाख रुपयांचा धनादेश’ यांचा समावेश असतो.