ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत न्या. धर्माधिकारी यांचे निधन

0
224

ज्येष्ठ गांधीवादी, लेखक, विचारवंत, माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी (वय ९१) यांचे गुरुवारी पहाटे खासगी रुग्णालयात निधन झाले.

ज्येष्ठ गांधीवादी दादा धर्माधिकारी यांचे पुत्र असलेल्या चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यावर लहानपणापासून गांधी तत्त्वज्ञानाचा प्रभाव राहिला. त्यांचा जन्म रायपूर (तेव्हाचा मध्य प्रदेश) येथे २० नोव्हेंबर १९२७ रोजी झाला.

त्यांचे प्राथमिक शिक्षण रायपूर येथे झाल्यानंतर वर्धा येथील नवभारत विद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. महात्मा गांधी यांच्या विचारांचे पाईक असलेले दादा धर्माधिकारी यांनी वर्धा येथील शाळेत त्यांना शिक्षण दिले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात एसबी सीटी महाविद्यालय व शासकीय विधी महाविद्यालयात झाले. १९४२च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. १९५८ मध्ये त्यांनी कायद्याची पदवी मिळवून नागपुरात वकिली सुरू केली. 

राज्य सरकारने १९६५ मध्ये त्यांची सहायक सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली. १९७२ मध्ये ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. १९८९मध्ये निवृत्तीनंतर त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रशासन लवादाच्या अध्यक्षपदी करण्यात आली होती.  या काळात त्यांनी महिलांचे अधिकार, आदिवासींचे हक्क व अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर आधारित अनेक वैशिष्ट्यपूर्ण निकाल दिले. आणीबाणीच्या काळात त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा अधिकार कुणी हिरावू शकत नाही, असा निकाल देत सरकारी दबावाला भीक घातली नाही. 

‘पद्मभूषण’ने सन्मान
निवृत्तीनंतर न्या. धर्माधिकारी यांचा विविध सामाजिक संस्थांशी असलेला संबंध अधिक दृढ झाला. बहुतेक गांधीवादी संस्थांमध्ये त्यांचा शब्द अखेरचा मानला जायचा. जमनालाल बजाज फाउंडेशनचे ते विश्‍वस्त होते. नागपुरातील सर्वोदय आश्रमाचे अध्यक्ष होते. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भारत सरकारने २००३ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ने सन्मानित केले होते.

धर्माधिकारी श्रद्धांजली
न्या. धर्माधिकारी यांनी त्यांचे पिता आणि ज्येष्ठ विचारवंत दादा धर्माधिकारी यांचा वैचारिक आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा समर्थपणे सांभाळला होता. अत्यंत कमी वयात स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेण्यासोबतच न्यायदानाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे.