जेईई-मेन आणि नीट परीक्षा यापुढे वर्षातून दोन वेळा

0
16

इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. यापुढे जेईई-मेन आणि नीट या दोन परीक्षा वर्षात दोन वेळा होणार आहेत.

जेईई मेन परीक्षा दरवर्षी जानेवारी आणि एप्रिल महिन्यात घेण्यात येईल, तर नीट परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात पार पडेल. आतापर्यंत या दोन्ही परीक्षा वर्षभरातून एकदाच घेतल्या जायच्या. त्यामुळे कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभर वाट पाहावी लागत असे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. विद्यार्थ्यांना आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं जावडेकरांनी सांगितलं.

दुसरी परीक्षा द्यायची की नाही, हा सर्वस्वी विद्यार्थ्यांचा निर्णय असेल. या दोन परीक्षांपैकी जो स्कोअर सर्वोत्तम असेल, तोच प्रवेशासाठी ग्राह्य धरला जाईल.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आतापर्यंत ही परीक्षा घेत असे, मात्र यापुढे राष्ट्रीय परीक्षा एजंसी (नॅशनल टेस्टिंग एजंसी- एनटीए) ही परीक्षा घेईल.

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या (एमबीबीएस आणि बीडीएस) प्रवेशांसाठी ‘नीट’ परीक्षा घेतली जाते.

ही परीक्षा देशभरातील 150 शहरांमध्ये घेतली जाते. महाराष्ट्रातील एकूण केंद्रांची संख्या 16 आहे. देशात सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये मिळून पदवी अभ्यासक्रमाच्या 60 हजार जागा आहेत.

मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांत एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सच्या पात्रतेसाठी नीट परीक्षा घेतली जाते.

ऑगस्ट महिन्यापासून जेईई आणि नीटसाठी काही प्रॅक्टिस टेस्टही सुरु होणार आहेत. या चाचणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील, अशी माहिती जावडेकरांनी दिली.