जगातील सर्वांत महाकाय विमानाची यशस्वी अवकाशझेप

0
182

जगातील सर्वांत महाकाय विमानाने पहिली उड्डाणचाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. सहा ‘बोईंग ७४७’ इंजिने असलेल्या या विमानाने कॅलिफोर्निया येथील मोजावे वाळवंटावरील आकाशात अडीच तास उड्डाण केले. फुटबॉलच्या मैदानाइतका पंखाचा विस्तार असलेल्या या विमानाचा वापर अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी केला जाणार आहे.

‘स्ट्रॅटोलाँच बेहेमोथ’ असे नाव असलेल्या या विमानाची संरचना दोन भागांची आहे. उपग्रह बसवलेले रॉकेट अंतराळाजवळ नेऊन सोडण्याची या विमानाची क्षमता आहे. नंतर हे रॉकेट प्रज्वलित होऊन उपग्रहास त्याच्या अंतराळातील कक्षेपर्यंत नेईल. या विमानाला हवेत झेप घेण्यासाठी खूपच लांब आणि रूंद धावपट्टीची गरज असली तरी जमिनीवरून थेट रॉकेटद्वारे उपग्रह सोडण्याच्या सध्याच्या पद्धतीपेक्षा ‘स्ट्रॅटोलाँच बेहेमोथ’द्वारे उपग्रह अंतराळात सोडणे सोयीचे ठरेल, असे सांगण्यात येते. ‘स्केल्ड कॉम्पोझिट्स’ या इंजिनीअरिंग कंपनीने त्याची निर्मिती केली आहे.

सध्या महाकाय प्रवासी विमान असलेल्या ‘एअरबस ए-३८०’ विमानापेक्षा ‘स्ट्रॅटोलाँच बेहेमोथ’ कित्येक पटीने मोठे आहे. ‘ए-३८०’च्या पंखांचा विस्तार ८० मीटर असून ‘स्ट्रॅटोलाँच बेहेमोथ’च्या पंखांचा विस्तार दीडपट म्हणजे ११७ मीटर इतका आहे. शनिवारी या विमानाने ताशी ३०४ किमीपर्यंतचा कमाल वेग आणि १७ हजार फुटांपर्यंतची कमाल उंची गाठली. ‘मायक्रोसॉफ्ट’चे सहसंस्थापक असलेल्या पॉल अॅलन यांनी ‘स्ट्रॅटोलाँच बेहेमोथ’च्या निर्मितीला अर्थसहाय केले होते.