चीनने प्रक्षेपित केला सागरी पहाणीसाठीचा उपग्रह

0
221

सागरी क्षेत्रातील पर्यावरणीय माहिती संकलीत करण्यासाठी तसेच जागतीक हवामान बदलाचा सागरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी चीनने एक स्वतंत्र उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला आहे. एचवाय – 1 सी असे या उपग्रहाचे नाव असून तो मार्च- 2सी रॉकेट मधून सकाळी 11 वाजून 15 मिनीटांनी प्रक्षेपित करण्यात आला.

समुद्राच्या पाण्याचे तापमान, त्याच्या पाण्याच्या रंगात होणारे बदल इत्यादी माहिती हा उपग्रह नियंत्रण कक्षाला पाठवणार आहे. सागरी संपत्तीच्या संबंधातील माहितीही यातून संकलीत होऊ शकणार असून सागरी बेटांच्या संरक्षणासाठी तसेच समुद्रात घडणाऱ्या दुर्घटनांविषयीही या उपग्रहाची मदत होऊ शकणार आहे. हा उपग्रह अंतरीक्षात पाच वर्ष कार्यरत राहणार आहे. ओशन मॉनिटअरींग साठी चीनने पाठवलेला हा तिसरा उपग्रह आहे. या आधी 2002 मध्ये आणि त्यानंतर 2007 मध्ये त्यांनी दोन उपग्रह प्रक्षेपित केले होते.

या उपग्रहातून सागराच्या पोटातील जलचरांच्या हालचालींविषयीही माहिती मिळू शकणार असल्याने त्याचा मच्छिमारांनाही चांगला उपयोग होऊ शकेल अशी माहिती चिनी अंतरीक्ष संशोधकांनी दिली. समुद्रात जहाजे पाठवून जे सागरी सर्वेक्षण केले जाते ते खूप वेळखाऊ आणि खर्चिक असते तसेच त्यात मनुष्यबळाचाही मोठा वापर होतो. तथापी हेच काम या उपग्रहाच्या माध्यमातून कमी वेळात आणि कमी खर्चात होऊ शकणार आहे.