चालू घडामोडी – 7 सप्टेंबर, 2019

0
49

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
चला बघूया आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी, तेही फक्त 5 मिनटात !!!
या चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.

मिस्बाह-उल-हक पाकिस्तानचा नवा मुख्य प्रशिक्षक :

पाकिस्तानचे माजी कर्णधार मिस्बाह-उल-हक यांची पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. विश्वचषक स्पर्धा 2019 मध्ये पाकिस्तानच्या संघाची कामगिरी फारशी चांगली होऊ शकली नाही. त्यामुळे मिकी आर्थर यांना प्रशिक्षकपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर आज पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून मिस्बाह-उल-हक यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच संघाच्या निवड समिती अध्यधपदीही मिस्बाह-उल-हक यांचीच निवड करण्यात आली आहे. तर माजी गोलंदाज वकार युनिस यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे. मिस्बाह-उल-हक यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी करारबद्ध करण्यात आले असल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून देण्यात आली आहे.

शिवाजी महाराज आणि मराठा सम्राज्याशी संबंधित किल्ल्यांचे पावित्र्य जपणार; पर्यटन विभागाचे स्पष्टीकरण :

‘छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल’ अशी माहिती पर्यटन विभागाच्या सचिव विनीता सिंगल यांनी दिली आहे. राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येण्याच्या बातम्या समोर आल्यानंतर हे स्पष्टीकरण पर्यटन विभागाने दिले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून 25 किल्ल्यांची यादी काढण्यात आली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाऊ शकतात, हे वृत्त पर्यटन विभागाने फेटाळून लावले आहे. राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. पहिले ‘वर्ग एक’ मधील आणि दुसरे ‘वर्ग दोन’ मधील. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे ‘वर्ग एक’ मध्ये येतात आणि अन्य सुमारे 300 किल्ले हे ‘वर्ग दोन’ मध्ये येतात.

विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोग – मोदी :

चंद्रयान-2 च्या संपूर्ण अभियानादरम्यान देश अनेकदा आनंदीत झाला आहे. आताही आपले ऑर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करत आहे. भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक आहे. विज्ञानात केलेले सर्व प्रयोग आपल्या अमर्याद धाडसाची आठवण देतात. चंद्रयान-2 च्या अंतिम चरणाचा निकाल अपेक्षेनुसार आला नाही, मात्र चंद्रयानाचा संपूर्ण प्रवास अतिशय उत्तम होता असे मोदी म्हणाले. इस्त्रोच्या सेंटरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी मोदी म्हणाले की, ज्ञानाचा सर्वात मोठा शिक्षक जर कुणी असेल तर तो आहे विज्ञान. विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोग आणि प्रयत्न असतो. कधीही हार न मानणाऱ्या आपल्या संस्कृतीचे इस्रोनं जतन केलं आहे. मी कालही म्हटले होते, आणि आजही म्हणतो की, मी तुमच्या सोबत आहे. देश देखील आपल्या सोबत आहे. तुम्हा सर्वांना पुढील सर्व मोहिमांसाठी खूप खूप शुभेच्छा.

पाकिस्तानचे माजी फिरकीपटू अब्दुल कादिर यांचे निधन :

पाकिस्तानचे महान माजी फिरकीपटू अब्दुल कादिर यांचे कार्डियक अटॅकने निधन झाले आहे. ते 63 वर्षाचे होते. 15 सप्टेंबर, 1955 रोजी कादिर यांचा लाहौर येथे जन्म झाला होता. कादिर यांनी आपल्या 16 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 67 कसोटी, 104 एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्व केलं आहे. कसोटीमध्ये 236 आणि एकदिवसीय सामन्यात 132 बळी घेतले आहेत. कादिर यांनी पाच एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान संघाचे कर्णधारपदही भूषावलं आहे. जागतिक क्रिकेटमध्ये त्यांना टॉप स्पिन आणि गुगली
गोलंदाजीमुळे ओळखले जात होते. आपल्या अनोख्या गोलंदाजी शैलीमुळे त्यांना डान्सिंग बॉलर म्हणूनही ओळखलं जात होतं. 1980 च्या दशकात पाकिस्तानच्या यशामध्ये कादिर यांचा मोलाचा वाटा होता. कादिर यांनी शेन वॉर्न आणि मुश्‍ताक अहमदसारख्या दिग्गज गोलंदाजांना आपल्या फिरकी गोलंदाजीचे बारकावे शिकवले आहेत.

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार :

देशातील 46 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. अहमदनगरमधील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाळेतील डॉ. अमोल बागुल, मुंबईतील ऑटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूलचे डॉ. ए. जेबीन जोएल आणि पुण्यातील विस्डम वर्ल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका दळवी या महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.