चालू घडामोडी – 7 ऑगस्ट, 2019

0
37

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
चला बघूया आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी, तेही फक्त 5 मिनटात !!!
या चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.

देशभर समान किमान वेतन :

देशभरातील संघटित तसेच, असंघटित क्षेत्रांतील कामगारांसाठी समान किमान वेतनाची खात्री देणारा कायदा संसदेने मंजूर केला. राज्यसभेने कामगार वेतन संहिता विधेयकावर शिक्कामोर्तब केले. लोकसभेत हे विधेयक आधीच संमत झाले आहे. या कायद्यामुळे देशभरातील त्या-त्या क्षेत्रांतील कामगारांना एकसमान किमान वेतन ठरलेल्या मुदतीत मिळू शकेल. कंपनीच्या मालकांकडून कामगारांचे किमान वेतन ठरवण्याचा अधिकार काढून घेण्यात आला असून आता हे वेतन केंद्र सरकार ठरवील. त्यामुळे कामगार कोणत्या कंपनीत काम करतो यावर त्याचे किमान वेतन अवलंबून राहणार नाही. कामगार कोणत्या क्षेत्रांतील आहेत आणि त्यांचे कार्यकौशल्य किती आहे, यावर त्यांचे किमान वेतन ठरेल आणि कंपनी मालकांना ते वेळेत द्यावेच लागेल. या दोन्हींसाठी वैधानिक संरक्षण देणारा कायदा संसदेने केला असून देशातील 50 कोटी संघटित तसेच, असंघटित कामगारांना त्याचा लाभ मिळेल, असे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी राज्यसभेत सांगितले.

चांद्रयान-2 ने गाठला आणखी एक टप्पा; चौथ्यांदा बदलली कक्षा :

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चंद्रयान-2 ची कक्षा यशस्वीरित्या बदलली. कक्षा बदलाचा हा चौथा टप्पा होता. चंद्रयान 2 ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात येत आहे. 2 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 27 मिनिटांनी चंद्रयान-2 च्या कक्षेत यशस्वीरित्या बदल करण्यात आला. चंद्रयान-2 पृथ्वीपासून किमान (पेरिजी) 277 किमी आणि कमाल (एपोजी) 89 हजार 472 किमी अंतरावर स्थिरावण्यात आले. 6 ऑगस्ट रोजी चांद्रयानाची कक्षा पुन्हा बदलण्यात आली आहे. चंद्रयान 2 चा प्रवास योग्य दिशेने सुरु आहे असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. प्रत्येकवेळी कक्षा बदल करताना चंद्रयान 2 ला ऊर्जा मिळणार आहे. कक्षा वाढवण्याच्या प्रक्रियेमुळे चंद्रयान 2 मध्ये पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने जाण्यासाठी पुरेशी ऊर्जा निर्माण होणार आहे.

भारतीय अंतराळवीरांना ‘व्योमनॉट्स’ म्हणून ओळखले जाणार :

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो 2022 पर्यंत अंतराळामध्ये अंतराळवीर पाठवणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. भारताला अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्षातच इस्रो पहिला भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवण्याची तयारी करत आहे. तर भारताच्या या अंतराळवीराला अँस्ट्रोनॉट नाही तर ‘व्योमनॉट’ असे म्हटले जाईल. भारताची ही मोहिम यशस्वी झाल्यास अंतराळात मानवरहीत मोहिम करणार भारत चौथा देश ठरेल. या आधी हा पराक्रम रशिया, अमेरिका आणि चीनने केला आहे. भारतीयांना अंतराळात पाठवण्याच्या मोहिमेला गगनयान असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत एका आठवड्यासाठी तीन भारतीय अंतराळवीरांना अंतराळ पाठवले जाणार आहे. अमेरिकेमध्ये अंतराळवीरांना ‘अॅस्ट्रोनॉट’ म्हणतात तर रशियामध्ये अंतराळवीरांना ‘कॉस्मोनॉट्स’ म्हणतात. चीनमध्ये अंतराळवीरांना ‘ताइकोनॉट्स’ असं म्हणतात. याच पार्श्वभूमीवर भारत आपल्या अंतराळवीरांना ‘व्योमनॉट्स’ या नावाने ओळखले जाणार आहे. ‘व्योमनॉट्स’मध्ये ‘व्योमन्’ हा संस्कृत शब्द आहे. या शब्दाचा अर्थ अंतराळ असा होतो. अनेकदा आकाश या अर्थानेही हा शब्द वापरला जातो. त्यामुळेच व्योमन् या शब्दापुढे अॅस्ट्रोनॉटमधील नॉट्स ही अक्षरे लावून ‘व्योमनॉट्स’ हा शब्द तयार झाला आहे.

‘चांद्रयान-2’कडून पृथ्वीची छायाचित्रे :

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो)‘ चांद्रयान 2’ ची चंद्राच्या दिशेने आगेकूच सुरू असून या दुसऱ्या चांद्रमोहिमेतील यानाने पृथ्वीची अनेक विलोभनीय छायाचित्रे पाठवली आहेत. पंधरा दिवसांपूर्वी चांद्रयान 2 अवकाशात झेपावले होते. एल 14 कॅमेऱ्याने ही छायाचित्रे टिपली असून त्यात पृथ्वी वेगवेगळ्या कोनांतून कशी दिसते याचे दर्शन घडते. 3 ऑगस्ट रोजी पाठवलेली ही छायाचित्रे आहेत. चांद्रयान 2 सोडण्यात आल्यानंतर पृथ्वीचे एक छायाचित्र लगेच प्रसारित करण्यात आले होते व ते चांद्रयान 2 वरील कॅमेऱ्याने काढल्याचा दावा करण्यात आला होता. पण, ती छायाचित्रे चांद्रयान 2 ने काढलेली नव्हती, असे स्पष्टीकरण इस्रोने त्या वेळी दिले होते.

विनेशला फोगटला सलग तिसरे सुवर्ण :

भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने वॉरसॉ येथे झालेली पोलंड खुली कुस्ती स्पर्धा जिंकून महिलांच्या 53 किलो गटामधील सलग तिसऱ्या सुवर्णपदकाची नोंद केली. 24 वर्षीय विनेशने अंतिम सामन्यात पोलंडच्या रुक्सानाचा 3-2 असा पराभव केला. उपांत्यपूर्व सामन्यात विनेशने ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सोफिया मॅट्सनचा (स्वीडन) पराभव केला. गेल्या महिन्यात विनेशने स्पेनमधील ग्रां. प्रि. कुस्ती स्पर्धा आणि टर्की येथील यासर डोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती. कुस्तीमध्ये बलाढय़ प्रतिस्पर्धी असेल, तर त्यातून स्वत:च्या मर्यादेच्या पलीकडे जाण्याचा सकारात्मक धडा मिळतो. पोलंड बॉक्सिंग स्पध्रेतील कामगिरीबाबत अतिशय समाधानी आहे. 53 किलो वजनी गटातील कामगिरी प्रेरणादायी आहे.