चालू घडामोडी – 3 सप्टेंबर, 2019

0
23

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
चला बघूया आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी, तेही फक्त 5 मिनटात !!!
या चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.

राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात अरपिंदर सिंगला सुवर्णपदक :

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा भारताचा तिहेरी उडीपटू अरपिंदर सिंग याने 59व्या राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. पण जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठीचे पात्रता निकष पार करण्यात तो अपयशी ठरला. तर अरपिंदरने या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करत 16.83 मीटर इतकी उडी मारली. मात्र पीएसी स्टेडियमवरील अतिउष्ण आणि दमट वातावरणात तो जागतिक स्पर्धेचा 16.95 मीटरचा पात्रता निकष पार करण्यासाठी 12 सेंमी इतका कमी पडला. तसेच कर्नाटकच्या यू. कार्तिक आणि तामिळनाडूच्या मोहम्मद सलाहुद्दीन यांनी अनुक्रमे 16.80 मीटर आणि 16.79 मीटर इतकी कामगिरी करत अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले.

अमेरिकेच्या F-35 ला टक्कर देणार रशियाचं Su-57E फायटर विमान :

रशियाने एमएकेएस इंटरनॅशनल एअर शो मध्ये पाचव्या पिढीचे Su-57E हे अत्याधुनिक फायटर विमान सादर केले आहे. या विमानाची टक्कर अमेरिकेच्या F-35 स्टेल्थ विमानाबरोबर असणार आहे. Su-57E या विमानाची अन्य देशांना विक्री करणार असल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे. सुखोईने Su-57E विमान विकसित केले आहे. हवा आणि जमिनीवरील विविध टार्गेटसचा लक्ष्यभेद करणारे Su-57E हे पाचव्या पिढीचे एक बहुउपयोगी विमान आहे. दिवसा-रात्री, कुठल्याही वातावरणात या विमानाचा वापर केला जाऊ शकतो. चौथ्या पिढीच्या फायटर विमानाशी तुलना करता रडारला चकवा देणारे स्टेल्थ तंत्रज्ञान या फायटर विमानामध्ये आहे. शत्रूच्या रडारवर हे विमान सापडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शत्रूच्या प्रदेशात घुसून हल्ला करणे अधिक सोपे होईल. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शस्त्रास्त्राची सिस्टिम आणि सुपरसॉनिक वेग Su-57E ला अधिक घातक बनवते. 29 जानेवारी, 2010 साली Su-57E ने पहिले उड्डाण केले होते.

इस्रायलने बनवली शत्रूच्या ड्रोनवर नियंत्रण मिळवण्याची टेक्नॉलॉजी :

शत्रूच्या प्रदेशातील माहिती गोळा करण्याबरोबर टार्गेटसवर हल्ला करण्यासाठी ड्रोन विमानांचा वापर केला जातो. या ड्रोन विमानांच्या बाबतीत इस्रायलने भन्नाट टेक्नॉलॉजी विकसित केली आहे. या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने शत्रूने पाठवलेल्या ड्रोन विमानावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येते. इस्रायलमधल्या एका डिफेन्स टेक्नॉलॉजी कंपनीने डब्ड स्कायलॉक हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने ऑपरेटर शत्रूच्या ड्रोन विमानाचे लँडिंग करुन आवश्यक विश्लेषणही करु शकतो. ठराविक अंतरावर असताना शत्रूच्या ड्रोन विमानावर नियंत्रण मिळवले जाते. डब्ड स्कायलॉकच्या सहाय्याने एकाचवेळी 200 ड्रोन विमानांवर नियंत्रण मिळवता येते. दोन महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात स्कायलॉकने या टेक्नॉलॉजीचे सादरीकरण केले. ड्रोन
विमान आणि ऑपरेटरमधल्या संपर्कात अडथळा आणून ड्रोनवर नियंत्रण मिळवतो. त्यानंतर ड्रोनचे लँडिंग करुन कुठली शस्त्रास्त्रे त्यामध्ये आहेत आणि अन्य माहिती मिळवता येते. राफेल कंपनीने सुद्धा ड्रोन विरोधी तंत्रज्ञान विकसित केले आहे. या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने सुद्धा शस्त्रसज्ज मानवरहित विमानावर नियंत्रण मिळवून लँडिंग करता येते.

अल्पवयीन मुलांकडून गुन्हा, मालक-पालक दोषी ; देशात नवी वाहतूकदंड आकारणी :

वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना 1 सप्टेंबरपासून अधिक दंड भरावा लागणार आहे. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत ही वाढ झाली आहे. नव्या मोटार वाहतूक कायद्यातील 63 तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते. यात कमीत कमी म्हणजे 500 रुपये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे 25 हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास हा अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला भोगावा लागणार आहे. परवाना नसताना वाहन चालवल्यास होणारा दंड 500 रुपयांवरून 5 हजार रुपये केला गेला आहे. मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालवल्यास आता 400 रुपयांऐवजी 2 हजार रुपये दंड आकारला जाईल. कायमस्वरूपी चालक परवाना मिळवण्याची प्रक्रियाही अधिक कडक करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून न दिल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख लोकांना प्राण गमवावे लागतात. अपघातांमध्ये दगावणाऱ्यांत तरुणांची संख्या सर्वाधिक असून हे प्रमाण एकूण अपघात मृत्यूंच्या 65% आहे. हे लक्षात घेत वाहनधारकांवर वचक बसवण्यासाठी नियम अधिक कडक करून वाहतुकीला शिस्त लावणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे, यासाठी नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक खात्याने जुन्या कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक गेल्या लोकसभेतच मांडले होते. त्याला 17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात मंजुरी मिळाली.

महिलांच्या बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांपेक्षा दुपटीहून अधिक :

भारतात महिलांमधील बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत त्यांची शैक्षणिक पात्रता बरोबरीची असूनही दुपटीहून अधिक आहे, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. ‘जेंडर इनक्लुजन इन हायरिंग इन इंडिया’ या शीर्षकाखाली हार्वर्डचे विद्यार्थी राशेल लेव्हेनसन व लायला ओकेन यांनी संशोधन निबंध सादर केला असून त्यात म्हटले आहे, की देशात 8.7% सुशिक्षित स्त्रिया बेरोजगार आहेत; तुलनेने चार टक्के पुरुषांना नोक ऱ्या नाहीत. महिलांचा निर्णय व त्यांची नोकरी शोधण्याची क्षमता यावर परिणाम करणारे घटक वेगळे असतात. लिंगभेदामुळे उच्च शिक्षित स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत नोक ऱ्या मिळण्यास कठीण जाते. भारतातील 200 प्रकारच्या नोक ऱ्यातील कर्मचारी भरतीची माहिती एका संस्थेकडून घेण्यात आली, त्यात 2016-17 दरम्यान कर्मचाऱ्यांच्या भरतीचे स्वरूप त्यातून स्पष्ट झाले. कर्मचारी भरती व्यवस्थापक व कर्मचारी बाजारपेठ तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली असता असे दिसून आले की, अजूनही नोकरी देताना भारतात लिंगभेदाचा परिणाम होत आहे. पात्रता व अनुभव, पर्याय, अर्ज प्रक्रिया यात महिलांना अडचणी आल्याचे दिसून आले. जर भारतातील नोकऱ्यांत महिलांना योग्य स्थान मिळाले तर देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न हे 27% वाढू शकते.