चालू घडामोडी – 29 जुलै, 2019

0
51

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
चला बघूया आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी, तेही फक्त 5 मिनटात !!!
या चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.

पाकिस्तान 2022 ला पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवणार :

भारताने ‘चंद्रयान-2’ चे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर पाकिस्तानने आता 2022 पर्यंत पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवण्याची घोषणा केली आहे. चीनच्या मदतीने पाकिस्तान पुढील चार वर्षांमध्ये पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवणार असल्याची माहिती पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी दिली आहे. अवकाशात अंतराळवीर पाठवण्याच्या पाकिस्तानच्या या पहिल्या महत्वकांशी मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड प्रक्रिया पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होईल अशी माहिती चौधरी यांनी दिली आहे. निवड प्रक्रियेमध्ये 50 जणांची निवड केली जाईल. त्यामधून अंतिम 25 जण निवडले जातील. ‘2022 मध्ये आम्ही आमच्या देशातील पहिला अंतराळवीर अंतराळात पाठवणार आहोत. देशाच्या अंतराळ संशोधनासंदर्भातील हा सर्वात महत्वाचा क्षण असेल,’ असे ट्विट चौधरी यांनी केले.

संसदीय समित्यांची नियुक्ती :

संसदेच्या विविध समित्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली असून अत्यंत महत्त्वाची वित्तीय समिती लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षण, रेल्वे, कररचना, नागरी विकास तसेच केंद्र सरकारच्या योजनांच्या ताळेबंदावरील महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालाची छाननी करण्याची जबाबदारी लोकलेखा समितीकडे असते. गेल्या वर्षी राफेल विमानांच्या खरेदीसंदर्भातील कॅगचा अहवाल लोकलेखा समितीकडे दिल्याचा दावा केंद्र सरकारने केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्याचे काम लोकलेखा समिती अप्रत्यक्षपणे करत असते. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याकडे या समितीचे अध्यक्षपद दिले जाते. मात्र गेल्या लोकसभेप्रमाणे नव्या लोकसभेतही विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला संख्याबळाअभावी मिळालेले नाही. विरोधी पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाचे गटनेते या नात्याने अधीर रंजन चौधरी यांच्याकडे लोकलेखा समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. या समितीतील 22 सदस्यांपैकी सात राज्यसभेचे सदस्य आहेत. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयाच्या खर्चाचा आणि निधी वापराचा हिशोब ठेवणाऱ्या अंदाज समितीचे (एस्टिमेट्स कमिटी) अध्यक्षपद गिरीश बापट यांच्याकडे देण्यात आले असून सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षा भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी असतील. इतर मागासवर्गीय कल्याण समिती नियुक्त झाली असून गणेश सिंह हे समितीचे अध्यक्ष असतील. अनुसूचित जाती-जमाती कल्याण समितीचे अध्यक्षपद किरीट सोळंकी यांच्याकडे देण्यात आले आहे.

भारताच्या क्रिकेट मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती ऑगस्ट महिन्यात :

विश्वचषक विजेते माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीकडे भारताच्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक नेमण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पदासाठीच्या मुलाखती ऑगस्टच्या मध्यावर होणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीने 26 जुलैला झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. कपिल यांच्यासह या समितीवर माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी आणि माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचा समावेश आहे. ‘त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती पुरुषांच्या प्रशिक्षकाची नेमणूक करणार आहे. ऑगस्ट महिन्यात मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण होईल. ही प्रभारी समिती नाही; परंतु या तिघांचे कोणतेही हितसंबंध नाहीत,’ असे प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी सांगितले. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अरुण, बांगर आणि श्रीधरन यांना आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमीरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती :

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र पाकिस्तानसाठी मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये आमीर खेळणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व करायला मिळालं हा माझा गौरव आहे, पण आता मर्यादीत षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मी निवृत्त होण्याचं ठरवलं आहे असे त्याने सांगितले. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वन-डे विश्वचषकात आमीरने भेदक मारा केला होता, मात्र आपल्या संघाला उपांत्य फेरी गाठून देण्यामध्ये तो अपयशी ठरला. जुलै 2009 साली श्रीलंकेविरुद्ध गॅले कसोटी सामन्यात आमीरने पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने 36 कसोटी सामन्यांत पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व केलं, या सामन्यांमध्ये आमीरने 30 च्या सरासरीने 119 बळी घेतले. एप्रिल 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्जस्टन कसोटीत 44 धावांत घेतलेले 6 बळी ही आमीरची कसोटी क्रिकेटमधली सर्वोत्तम कामगिरी राहिलेली आहे.

कर्नाटकात भाजपाचीच सत्ता, येडियुरप्पा पुन्हा बनले मुख्यमंत्री :

भाजपाचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांनी 26 जुलैला कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर कर्नाटकात पुन्हा एकदा येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी तेथील भाजपा कार्यालयात जाऊन अन्य नेत्यांची भेट घेतली. कर्नाटकातील 17 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर कर्नाटक सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान कुमारस्वामी यांच्यासमोर होते. परंतु कुमारस्वामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करता आले नव्हते. त्यानंतर कुमारस्वामी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु भाजपाने त्या ठिकाणी सावध भूमिका घेण्याचा निर्णय घेतल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर कर्नाटकातील राजकीय नाट्याचा दुसरा अंक पहायला मिळाला होता. विधासनसभेच्या अध्यक्षांनी तीन बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले होते.