चालू घडामोडी – 28 जून, 2019

0
25

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
चला बघूया आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी, तेही फक्त 5 मिनटात !!!
या चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.

जयशंकर यांना राज्यसभेची उमेदवारी :

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भाजपमध्ये औपचारिकरीत्या प्रवेश केल्यानंतर त्यांना गुजरातमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यातील दुसऱ्या जागेसाठी जुगलजी माथुरजी ठाकोर हे उमेदवार असतील. राजनैतिक अधिकारी म्हणून कारकीर्द असलेले आणि माजी परराष्ट्र सचिव असलेले जयशंकर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणून समावेश केला होता. 30 मे रोजी इतर मंत्र्यांसोबत त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती.

‘एशिया पॅसिफिक’चा भारताला पाठिंबा :

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात दोन वर्षे मुदतीच्या अस्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीस चीन व पाकिस्तान यांचा समावेश असलेल्या एशिया-पॅसिफिक गटाने पाठिंबा दिला आहे. पंधरा सदस्यीय सुरक्षा मंडळातील पाच अस्थायी सदस्यपदांसाठी पुढील वर्षी जूनमध्ये निवडणूक होत असून यात निवड झालेल्या अस्थायी सदस्यांना 2021 व 2022 अशी दोन वर्षे काम करता येईल. एशिया-पॅसिफिक गटातील देशांनी भारताच्या उमेदवारीला एकमुखी पाठिंबा दिला आहे. सुरक्षा मंडळाचे अस्थायी सदस्यत्व 2021 व 2022 अशा दोन वर्षांसाठी आहे. सर्व 55 सदस्यांचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी भारताच्या वतीने आपण आभार मानतो, असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सय्यद अकबरूद्दीन यांनी सांगितले.

बालाकोट स्ट्राइकचे रणनितीकार ‘RAW’ चे नवीन चीफ :

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता. या एअर स्ट्राइकच्या प्लानिंगमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे रॉ चे अधिकारी सामंत गोयल यांची आता रॉ च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एअर स्ट्राइकच्या ऑपरेशननंतर तीन महिन्यात गोयल यांची एजन्सीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गोयल हे 1984 च्या पंजाब केडरचे अधिकारी आहेत. 90 च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवाद शिखरावर होता. त्यावेळी हा दहशतवाद संपवण्यात सामंत गोयल यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दुबई आणि लंडनमध्ये सुद्धा त्यांनी सेवा बजावली आहे. सामंत गोयल अनिल कुमार धसमाना यांची जागा घेतली. अडीचवर्षाच्या शानदार सेवेनंतर धसमाना निवृत्त होत आहेत. सामंत गोयल सध्या रॉ च्या ऑपरेशन्स विभागाची जबाबदारी संभाळत आहेत. बालाकोट एअर स्ट्राइक आणि उरी हल्ल्यानंतर 2016 साली करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या आखणीमध्ये सामंत गोयल यांची भूमिका महत्वाची होती. सामंत गोयल यांना रॉ मध्ये पाकिस्तानच्या विषयाचे तज्ञ समजले जाते.

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जातपडताळणीविना प्रवेश :

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल व्यवस्थापन, वास्तुरचनाकार या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रवेश प्रक्रिया प्राधिकरण यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली. या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीसाठी जातवैधता प्रमाणपत्रही सादर करण्याची सूचना देण्यात आली होती. सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास (एसईबीसी) प्रवर्गातील म्हणजेच मराठा समाजातील बहुतांश
विद्यार्थ्यांकडे जातवैधता प्रमाणपत्र नसल्याने त्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि अजित पवार यांनी सभागृहात औचित्याच्या माध्यमातून या गंभीर समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले. जातवैधता प्रमाणपत्रास लागणारा वेळ लक्षात घेता विद्यार्थ्यांनी जातपडताळणीसाठी दाखल केलेल्या अर्जाची पावती ग्राह्य धरण्यात यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

विश्वचषक 2019 – सलग 4 अर्धशतकांसह विराट कोहलीचा विक्रम, मोहम्मद अझरुद्दीनला टाकलं मागे :

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 2019 विश्वचषक स्पर्धेत आश्वासक फॉर्मात आहे. विंडीजविरुद्ध सामन्यात विराट कोहलीने 72 धावांची खेळी केली. वन-डे क्रिकेटच्या इतिहासातलं कोहलीचं हे 53 वं अर्धशतक ठरलं. याचसोबत विश्वचषक स्पर्धेत 4 सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. विराटने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला. अझरुद्दीनच्या नावावर एका विश्वचषक स्पर्धेत 3 अर्धशतकं जमा आहेत. एकीकडे इतर भारतीय फलंदाज विंडीजच्या माऱ्यासमोर माघारी परतत असताना विराटने मैदानावर तग धरत भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 20 हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला. सचिनने माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. कोहलीने लोकेश राहुल आणि महेंद्रसिंह धोनीसोबत मोलाची भागीदारी केली. विंडीजविरुद्ध सामन्यात विराटने जबाबदारीने फलंदाजी करत 8 चौकार लगावले. या स्पर्धेत भारतासमोर रविवारी 30 जूनला यजमान इंग्लंडचं आव्हान असणार आहे.