चालू घडामोडी – 15 ऑगस्ट, 2019

0
44

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
चला बघूया आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी, तेही फक्त 5 मिनटात !!!
या चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.

सचिन-सेहवागला मागे टाकत विराट-रोहित जोडी ठरली अव्वल :

विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. संघाला पाठीमागे सोडून रोहित आपली पत्नी आणि मुलीसह एकटात भारतात निघून आल्यामुळे या चर्चांना अधिक उधाण आलं होतं. विंडीज दौऱ्यावर निघण्याआधी कर्णधार विराट कोहलीने या सर्व चर्चा चुकीच्या असल्याचं सांगितलं होतं. मैदानाबाहेरील या चर्चांचा रोहित-विराटच्या मैदानातील कामगिरीवर मात्र अजिबात परिणाम होताना दिसत नाहीये. दुसऱ्या वन-डे सामन्यात रोहित-विराटने 74 धावांची भागीदारी करत सचिन-विराट जोडीचा आणखी एक विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. विराट-रोहित जोडीची वन-डे कारकिर्दीतली ही 32 वी अर्धशतकी भागीदारी ठरली आहे. सचिन-सेहवाग जोडीच्या नावावर 31 अर्धशतकी भागीदारी जमा आहेत. भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकी भागीदारी करण्याच्या विक्रम हा सचिन-सौरव गांगुली जोडीच्या नावावर आहे. या जोडीने 55 अर्धशतकी भागीदारी केल्या आहेत.

आयसीसीच्या नियमाला बीसीसीआयचा आक्षेप :

देशांतर्गत स्पर्धासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळाडूंच्या सहभागाबाबत परवानगी घेण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नव्या नियमाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जोरदार आक्षेप घेतला आहे. इंडियन प्रीमियर लीग किंवा रणजी करंडकासह अन्य देशांतर्गत स्पर्धासाठी आयसीसीकडून परवानग्या मागण्याची बीसीसीआयची इच्छा नाही. आंतरराष्ट्रीय खेळाडूने आपल्या पालक मंडळाने आयोजित केलेल्या T-20 लीगसह फक्त एकाच आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळावे, असा आयसीसीचा नवा नियम प्रस्तावित आहे. आयसीसीने हा नवा नियम बनवला असून आयपीएल, बिग बॅश तसेच रणजी करंडकासह शेकडो देशांतर्गत स्पर्धासाठी संलग्न असलेल्या जगातील सर्व राष्ट्रीय क्रिकेट मंडळांनी आयसीसीची
परवानगी घेण्याचे सुचवले आहे. देशांतर्गत स्पर्धाचे आयोजन करताना आयसीसीची भूमिका ही फारच छोटी असते. त्यामुळे आम्ही आमचा आक्षेप, हरकती आणि निरीक्षणे आयसीसीला कळवली आहेत, असे बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकार्‍याने सांगितले.

धोनीची काश्मिरी खेळाडूंसाठी क्रिकेट अकादमी स्थापन करण्याची तयारी :

भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी, जम्मू-काश्मीरमधील खेळाडूंसाठी क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या तयारीत आहे. काश्मीरमधल्या तरुण खेळाडूंना धोनीच्या अकादमीत मोफत प्रशिक्षण घेता येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी यासंदर्भात केंद्रीय क्रीडा मंत्रालयाशीही चर्चा करणार असल्याचं समजतंय. धोनीने सध्या 2 महिने क्रिकेटमधून विश्रांती घेतली असून तो भारतीय सैन्यदलाच्या 106 TA Battalion (Para) तुकडीत काम करत आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं 370 कलम केंद्रीय गृहमंत्रालयाने काढून टाकल्यानंतर, सध्या काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे काश्मिरी जनतेच्या उज्वल भविष्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवण्याच्या तयारीत आहे. काश्मीरमधल्या उभरत्या आणि तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी धोनीने आपल्या खांद्यावर घेतल्याचं समजतंय. आगामी काळात धोनी आपल्या या योजनेबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला माहिती देणार आहे. धोनी सध्या दक्षिण काश्मीर परिसरात आपल्या सैन्यदलातल्या तुकडीसोबत गस्त घालण्याचं काम करतोय. विश्वचषक संपल्यानंतर धोनीवर निवृत्तीचा दबाव वाढत होता, मात्र धोनीने अद्याप अधिकृतरित्या आपल्या निवृत्तीची घोषणा केली नाहीये.

‘नॉलेज क्लस्टर’मध्ये पुण्यासह सहा शहरांची निवड :

केंद्र सरकारच्या ‘शहर ज्ञान व नवोपक्रम समूह’ (सिटी नॉलेज अँड इनोव्हेशन क्लस्टर्स) उपक्रमात विकासासाठी पुणे, भुवनेश्वर, चंडीगड, जोधपूर, अहमदाबाद, हैदराबाद आणि कोलकाता या सहा शहरांची निवड करण्यात आली आहे. या शहरांमध्ये किंवा राज्यात अस्तित्वात असलेल्या संस्था आणि निरनिराळे उद्योग यांच्यात समन्वय साधण्यासाठी या समूहांची योजना करण्यात येत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांसाठी निश्चित केलेल्या अ‍ॅजेंडांतर्गत हा प्रकल्प प्रधान वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) कार्यालयाच्या नेतृत्वाखाली प्राधान्याने राबवण्यात येत आहे. या सर्व शहरांसाठी ‘कन्सेप्ट नोट्स’ तयार असून, काही शहरांमध्ये चर्चात्मक बैठकी आधीच सुरू झालेल्या आहेत, असे पीएसए कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय स्तरावरील 20 प्रयोगशाळा याआधीच भुवनेश्वरच्या यादीवर असून, तीसहून अधिक औद्योगिक घराणी किंवा उद्योगांनी पुण्यात झालेल्या निरनिराळ्या बैठकींमध्ये भाग घेतला. उपक्रमाचा उद्देश – एखाद्या विशिष्ट उद्योगासमोर काही समस्या असेल आणि ती सोडवण्याची आवश्यकता असेल, तर शास्त्रज्ञ ते करू शकतात किंवा आर अँड डी प्रयोगशाळेकडे असलेल्या एखाद्या उपकरणामार्फतही ते केले जाऊ शकेल. सध्या अशा प्रकारचे काही उपकरण किंवा तांत्रिक तोडगा असल्याची माहितीही नसते, किंवा कुणाला त्यापर्यंत पोहचता येत नाही. हे सर्व एकत्र आणणे हा या उपक्रमामागील हेतू आहे.

नदालचे 35वे जेतेपद :

स्पेनच्या राफेल नदालने रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याचा 6-3, 6-0 असा धुव्वा उडवत माँट्रियल मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. तसेच यासह नदालने नोव्हाक जोकोव्हिचला (33 जेतेपदे) मागे टाकत आपल्या मास्टर्स विजेतेपदांची संख्या 35 वर नेली. तर लाल मातीचा बादशाह समजल्या जाणाऱ्या नदालने आपल्या कारकीर्दीत पहिल्यांदाच हार्डकोर्टवर इतक्या सहजपणे विजेतेपद कायम राखले.