चालू घडामोडी – 14 ऑगस्ट, 2019

0
31

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
चला बघूया आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी, तेही फक्त 5 मिनटात !!!
या चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची मोहर :

अत्यंत मानाच्या 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली असून, ‘भोंगा’ हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला आहे, तर आयुष्मान खुराना, तब्बू आणि राधिका आपटे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘अंधाधुन’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा बहुमान मिळवला आहे. शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित आणि निर्मित ‘भोंगा’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. ‘नाळ’ चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोफळे याने सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जिंकला आहे. ‘नाळ’ साठी सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. अभिनेता स्वानंद किरकिरे याने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या (चुंबक) पुरस्कारावर नाव कोरले आहे.

सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी :

दिल्ली येथे पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांच्याच नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. याआधी राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. राहुल गांधी यांनी 3 जुलै, 2019 रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल यांनी पक्षाध्यक्षपद नाकारलं. त्यानंतर तीन महिन्याहून अधिक काळ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्तच होते. पक्षाच्या बैठकीत सर्वमताने सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्षपदी निवड झाली आहे.

उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचण्या :

अमेरिका-दक्षिण कोरिया यांच्या संयुक्त लष्करी कवायतींचा निषेध करण्यासाठी उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्या केल्या. अध्यक्ष ट्रम्प यांनीही संयुक्त लष्करी कवायतींबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी या चाचण्या केल्या. सोल येथे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन लघु पल्ल्याची आंतरखंडीय क्षेपणास्त्रे ही ईशान्येकडील हामुहंग शहरातून सोडण्यात आली. ती 400 कि.मी अंतर कापून कोरिया द्वीपकल्प व जपान यांच्या दरम्यानच्या सागरात कोसळली. दोन आठवडय़ात क्षेपणास्त्र चाचण्यांची ही पाचवी वेळ होती. या चाचण्या म्हणजे दक्षिण कोरिया व अमेरिका यांच्या संयुक्त लष्करी कवायतींविरोधात इशारा असल्याचे किम जोंग उन यांनी म्हटले आहे. या चाचण्या लष्करी कवायतींनी किम यांचा असलेला विरोध अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी मान्य केल्यानंतर झाल्या आहेत. ट्रम्प यांचा कवायतींना असलेला विरोध लष्करी स्वरूपाचा नसून आर्थिक आहे. ‘किम जोंग यांचे एक सुंदर असे पत्र मिळाले असून ते सकारात्मक आहे. किम हे संयुक्त लष्करी कवायतींच्या विरोधात आहेत पण या कवायती मलाही पसंत नाहीत. त्यासाठी जपान व दक्षिण कोरिया यांच्याशी सल्लामसलत केली जात आहे.’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

नेपाळात सापडले जगातील सर्वाधिक उंच सरोवर :

नेपाळच्या हिमालय पर्वत रांगांत नवे सरोवर सापडले असून हे जगातील सर्वाधिक उंचावरील सरोवर ठरणार आहे. 4,919 मीटर उंचावर असलेले तिलिचो सरोवर हे सध्या जगातील सर्वाधिक उंचावरील सरोवर आहे. विशेष म्हणजे, तिलिचो सरोवरही नेपाळातच आहे. काही महिन्यांपूर्वी गिर्यारोहकांच्या एका पथकाला नेपाळातील मनंग जिल्ह्यातील हिमालयाच्या पर्वत रांगात काजीन सारा सरोवर सापडले. हे सरोवर चामे ग्रामीण नगरपालिकेच्या हद्दीतील सिंगारखरका परिसरात आहे. गिर्यारोहकांनी केलेल्या नोंदीनुसार, हे सरोवर 5,200 मीटर उंचावर आहे. तथापि, याची अद्याप अधिकृत पडताळणी करण्यात आलेली नाही. हे सरोवर अंदाजे 1,500 मीटर लांब आणि 600 मीटर रुंद आहे, असे चामे ग्रामीण नगरपालिकेचे प्रमुख लोकेंद्र घाले यांनी सांगितले. घाले यांनी म्हटले की, नव्याने सापडलेले सरोवर 5 हजार मीटरपेक्षा अधिक उंचावर असल्यामुळे अधिकृत पडताळणीनंतर ते जगातील सर्वाधिक उंचावरील सरोवर ठरणार आहे. सध्या सर्वाधिक उंचीवरील सरोवर असा किताब असलेले तिलिचो सरोवर 4,919 मीटर उंचावर असून त्याची लांबी 4 कि.मी., रुंदी 1.2 कि. मी., तर खोली 200 मीटर आहे. तिलिचो सरोवराच्या तुलनेत नवे सरोवर आकाराने छोटे आहे, तसेच त्याची खोलीही अद्याप मोजली गेलेली नाही.

बजरंगला सुवर्णपदक, विनेश अंतिम फेरीत :

भारताच्या दोन आघाडीच्या पहेलवानांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करत आपली लय कायम राखली आहे. बजरंग पुनिया याने तबिलिसी ग्रां.पीमध्ये आपल्या विजेतेपदाचा बचाव केला. तर विनेश फोगाट हिने मेदवेद कुस्ती स्पर्धेत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. जॉर्जियामध्ये खेळल्या गेलेल्या तबिलसी ग्रांपीमध्ये गेल्या वर्षी सुवर्ण पदक जिंकणाऱ्या बंजरंग याने पुरूषांच्या फ्री स्टाईल कुस्तीमध्ये अंतिम सामन्यात इराणच्या पेइमन बिब्यानीला 2-0 अशी मात दिली. बेलारुसच्या मिन्स्कमध्ये मेदवेद कुस्ती स्पर्धेत विनेश हिने महिलांच्या 53 किलो गटात स्थानिक पहेलवान याफ्रेमेनका हिला एकतर्फी झालेल्या सामन्यात 11-0 असे पराभूत केले. दुसऱ्या हाफमध्ये विनेश जास्त आक्रमक राहिली. विनेश हिने सुरुवातीला प्रतिस्पर्धी खेळाडूच्या डाव्या पायावर हल्ला केला. मात्र ती त्याचा फायदा घेऊ शकली नाही. बेलारुसच्या खेळाडूने फारसा चांगला खेळ केला नाही. त्याचा फायदा विनेश हिला मिळाला.