चालू घडामोडी – 12 जून, 2019

0
38

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
चला बघूया आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी, तेही फक्त 5 मिनटात !!!
या चा लू घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.

14 जूनला होणार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असण्याची माहिती आली आहे. 14 जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा आहे. याआधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचं सांगितलं होतं. येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं मुनगंटीवार म्हणाले होते. शिवसेना आणि मित्र पक्षांनाही त्यांच्या अपेक्षेप्रमाणं मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल, असे सूतोवाच मुनगंटीवारांनी केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नवनियुक्त केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली होती. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलासंदर्भात शाह यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती. विधिमंडळ अधिवेशनापूर्वी खातेविस्तार आणि बदल होण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली होती. रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री झाल्याने नव्या प्रदेशाध्यक्षाचीही नियुक्ती केली जाणार असून त्याबाबतही फडणवीस आणि शहा यांच्या बैठकीत बोलणी झाली होती.

UN मध्ये पॅलेस्टाइन विरोधात भारताचे इस्त्रायलच्या बाजूने मतदान :

संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेमध्ये भारताने एका बिगर सरकारी पॅलेस्टाइन संस्थेविरोधात इस्त्रायलच्या बाजूने मतदान केले. भारताने संयुक्त राष्ट्रात अशा प्रकारे इस्त्रायलच्या बाजूने मतदान करण्याची ही दुर्मिळ बाब आहे. प‌ॅलेस्टीनियन संस्थेने हमास बरोबरचे आपले संबंध उघड न केल्यामुळे त्यांना सल्लागाराचा दर्जा देण्यावर इस्त्रायलने आक्षेप घेतला होता. भारताने संयुक्त राष्ट्रात या प्रस्तावावर इस्त्रालयच्या बाजूने मतदान केले. 6 जूनला इस्त्रायलने ईसीओएसओसीच्या बैठकीत पॅलेस्टीनियन एनजीओ विरोधात एल.15 हा मसुदा प्रस्ताव सादर केला होता. 28 विरुद्ध 15 मतांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पाच देशांनी मतदानात भाग घेण्याचे टाळले. ब्राझील, कॅनडा, कोलंबिया, फ्रान्स, जर्मनी, भारत, आयर्लंड, जापान,
कोरिया, युक्रेन, युके आणि अमेरिका या देशांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. संयुक्त राष्ट्रात साथ दिल्याबद्दल इस्त्रायलने भारताचे आभार मानले आहेत. संयुक्त राष्ट्रात निरीक्षकाचा दर्जा मिळवण्यासाठी दहशतवादी संघटना ‘शहीद’ची विनंती फेटाळून लावली आहे. नुकसान करण्याचा इरादा बाळगणाऱ्या दहशतवादी संघटनांविरोधात आपण असेच एकत्र राहून लढत राहू असे माया काडोश यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. इस्त्रालयच्या त्या भारतातील अधिकारी आहेत. शहीद संस्था महत्वाची माहिती सादर करु न शकल्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या परिषदेने त्यांचा अर्ज परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

नीरव मोदीच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी :

पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा गंडा घालून पसार झालेल्या नीरव मोदीच्या जामीन याचिकेवर 12 जुन रोजी सुनावणी होणार आहे. लंडनमधील रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये मंगळवारी या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली. यापूर्वी तीन वेळा न्यायालयाने त्याची जामीन याचिका फेटाळली होती. 19 मार्च रोजी नीरव मोदीला स्कॉटलंड यार्डमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय यंत्रणा प्रयत्नशील आहेत. याचिकेवरील सुनावणीदरम्यान नीरव मोदीच्या वकील क्लेअर मोंटगोमेरी यांनी नीरव मोगी आणि त्याच्या भावामध्ये झालेले ईमेल संभाषण वाचून दाखवले. या इमेलवरून पुराव्यांशी कोणत्याही प्रकारची छेडछाड केली नसल्याचे सिद्ध होते, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच अबुधाबीच्या ज्या साक्षीदारांनी
ईडीच्या इमेलला उत्तर दिले आहे, त्यांनाही आपण पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले.

जहाल नक्षली नर्मदाला अटक, गडचिरोलीतील भूसुरुंग स्फोटाप्रकरणी होती आरोपी :

गेल्या 22 वर्षांपासून भूमिगत असलेली जहाल नक्षलवादी नर्मदा ऊर्फ अलुरी कृष्णा कुमारी ऊर्फ सुजाथक्का आणि तिचा पती किरणकुमार या दोघांना तेलंगण आणि गडचिरोली पोलिसांनी संयुक्तपणे हैदराबाद येथे अटक केली. या कारवाईने नक्षलवादी चळवळीला जबर धक्का बसला आहे. आंध्र प्रदेशचा प्रमुख नक्षलवादी किरण कुमार ऊर्फ किरण दादा आणि त्याची पत्नी नर्मदा अगदी सुरुवातीपासून नक्षल चळवळीत सक्रिय होते. या जोडप्यावर छत्तीसगड सरकारने 20 लाखांचे इनाम जाहीर केले होते. किरण कुमार हा दंडकारण्य विशेष झोनल कमिटीचा सदस्य (डीकेएसझेडसी) असून गडचिरोली जिल्हय़ाचा प्रभारी होता. छत्तीसगड राज्यात या दोघांची दहशत होती. किरण कुमार हा आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील रहिवासी आहे. नक्षलवाद्यांच्या (डीकेएसझेडसी) राजकीय अंग असलेल्या ‘प्रभात’ पत्रिकेचा तो संपादक होता. तांत्रिकदृष्टय़ा तो अतिशय सक्षम आहे तर त्याची पत्नी नर्मदा ही कृष्णा जिल्हय़ातील गुडिवाडा येथील रहिवासी आहे. नर्मदाला कॅन्सरने ग्रासले होते. त्यामुळे वर्षभरापूर्वीच किरणकुमार व नर्मदा हे दोघेही चळवळीतून बाहेर पडले. हैद्राबाद येथील कॅन्सर रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी ती उपचारांसाठी रुग्णालयात गेली होती. ही माहिती तेलंगणा पोलिसांना मिळाली. त्यामुळे तेलंगणा पोलीस तिच्या मागावर होतेच. मात्र,या दाम्पत्यावर तेलंगणा राज्यात एकही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे तेलंगणा पोलिसांनी नर्मदाची माहिती गडचिरोली पोलिसांना दिली. प्राप्त माहितीच्या आधारावर गडचिरोली जिल्हय़ातील प्राणहिता पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उपअधीक्षक बन्सल हैदराबाद येथे पथकासह गेले व तिथेच या दाम्पत्याला अटक केली.

‘एलईडी’ बेल्स बदलण्यास ICC चा नकार :

चेंडू स्टम्पवर आदळल्यानंतरही काही वेळेला न पडणाऱ्या वादग्रस्त ‘एलईडी’ बेल्स बदलण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नकार दर्शवला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली तसेच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने या बेल्सविषयी तक्रार केली होती. ‘‘स्पर्धेदरम्यान कोणत्याही प्रकारचे बदल केले जाणार नाहीत, जेणेकरून स्पर्धेच्या एकात्मतेला धक्का पोहोचेल. 10 संघांमध्ये होणाऱ्या सर्व 48 सामन्यांसाठी सारखीच साधनसामुग्री वापरली जाईल. गेल्या चार वर्षांपासून ‘एलईडी’ स्टम्पमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. जवळपास एक हजारपेक्षा जास्त सामन्यांमध्ये हेच तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. काही वेळेला समस्या होऊ शकते, पण सर्वानी त्याचा स्वीकार करायला हवा,’’ असे ‘आयसीसी’च्या पत्रकात म्हटले आहे.