चालू घडामोडी – 12 जुलै, 2019

0
14

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
चला बघूया आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी, तेही फक्त 5 मिनटात !!!
या चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.

मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला दिलासा :

मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर पार पडलेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास तूर्तास नकार दिला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी राज्य सरकारला नोटीस पाठवली असून उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. राज्य सरकारने दोन आठवड्यांनंतर आपलं उत्तर दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय पुढील निर्णय घेणार आहे. मराठा आरक्षणाविरोधातील दोन याचिकांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्य पीठापुढे महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. कुणबी आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) संघटनांकडूनही दोन आव्हान याचिका सादर करण्यात आल्या होत्या.

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द :

पाच वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या सेवेत मराठा कोटय़ातील रिक्त ठेवलेल्या विविध पदांवर तात्पुरत्या स्वरूपात खुल्या प्रवर्गातून केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे गेली पाच वर्षे शासकीय सेवेत काम केलेल्या सुमारे 350 अधिकारी-कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार आहे. त्यांच्या जागी मराठा समाजातील उमेदवारांच्या नियुक्त्या करण्याचे आदेश सर्व शासकीय-निमशासकीय विभाग व कार्यालयांना देण्यात आले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने यासंबंधी एक सविस्तर शासन आदेश जारी केला आहे. त्यानुसार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या अध्यादेशाप्रमाणे शासकीय सेवेतील विविध पदांवर मराठा कोटय़ांतर्गत तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेल्या मराठा उमेदवारांच्या नियुक्त्यांना नव्या मराठा आरक्षण कायद्याने संरक्षण देण्यात आले आहे. तसेच त्या कालावधीत न्यायालयाच्या स्थगितीमुळे भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. ती ‘एसईबीसी’ आरक्षण लागू करून पूर्ण करण्याच्या सूचनाही सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.

मेहुल चोक्सीची 24 कोटींची संपत्ती जप्त :

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला सक्तवसूली संचलनालयाने मोठा दणका दिला आहे. त्याची तब्बल 24 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. याशिवाय त्याची किंमती वाहनं, बँक खात्यांचा देखील ताबा घेण्यात आला आहे. दुबईत असलेल्या त्याच्या तीन संपत्तींवर ईडीचे लक्ष होते. या संपत्तींची किंमत जवळपास 24.77 कोटी आहे. तब्बल 13 हजार कोटींच्या या बँक घोटाळ्यातील सह आरोपी मेहुल चोक्सी सध्या अँटिग्वामध्ये आहे. भारत सरकारकडून फरार उद्योजक नीरव मोदी व मेहुल चोक्सीला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पीएनबी घोटाळा उघड होऊन गुन्हा नोंदविला जाण्यापूर्वीच चोक्सी भारतातून फरार झाला होता.

16 वर्षीय भारतीय वेटलिफ्टरने एकाच प्रयत्नात मोडले 3 विक्रम :

युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णकमाई करणारा भारताचा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा याने जागतिक पातळीवर दमदार कामगिरी केली. कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी (11 जुलै) त्याने एका प्रयत्नात तब्बल 3 विक्रम मोडीत काढले. 16 वर्षाच्या जेरेमीने दिमाखदार कामगिरी करताना 67 किलो वजन गटात स्नॅचमध्ये 136 किलो वजन उचलण्याचा पराक्रम केला. त्याच्या या उचलीमुळे त्याने थेट युवा विश्वविक्रम, आशियाई स्पर्धांमधील विक्रम आणि राष्ट्रकुल स्पर्धांमधील विक्रम असे 3 विक्रम मोडून टाकले. या आधीचा युवा विश्वविक्रम आणि आशियाई विक्रम हा देखील जेरेमीच्याच नावावर होता. त्याने एप्रिल महिन्यात चीनच्या निग्बो येथे 134 किलो वजन उचलण्याचा पराक्रम केला होता.

चीनी सैनिकांची लडाखमधून घुसखोरी :

चीनी सैनिकांनी सीमारेषा पार करुन भारतात घुसखोरी केल्याचं समोर आलं आहे. चीनी सैंनिकांना लडाखमध्ये सीमारेषा पार करुन सहा किमी आतमध्ये आल्याचं पाहण्यात आलं आहे. एका बातम्यावाहिनीने एका फोटोच्या हवाल्याने दावा केला आहे की, 6 जुलै रोजी चीनी सैनिक डेमचोक, कोयूल आणि डुंगटी परिसरात घुसले होते. यावेळी भारतीय जमिनीवर चीनी झेंडे फडकावण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे अशावेळी सीमारेषा पार करुन घुसखोरी करण्यात आली जेव्हा लदाखमधील काही लोक बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करत होते. याचवेळी चीनी सैंनिक तिथे पोहोचले आणि वाढदिवस साजरा करण्यापासून रोखलं.