चालू घडामोडी – 12 ऑगस्ट, 2019

0
54

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
चला बघूया आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी, तेही फक्त 5 मिनटात !!!
या चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.

केजरीवाल सरकार प्रत्येक वापरकर्त्यास दर महिन्याला 15 जीबी डाटा मोफत देणार :

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांसाठी एक मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले की, दिल्लीत तब्बल 11 हजार ठिकाणी हॉटस्पॉट लावले जाणार आहेत. एवढेच नाहीतर मोफत वायफाय सुविधा देखील लवकरच सुरू केली जाणार आहे. ज्यामुळे प्रत्येक वापरकर्त्यास 15 जीबी डाटा प्रत्येक महिन्याला मोफत दिला जाईल आणि हा यासाठीचा पहिला टप्पा असल्याचेही त्यांनी सांगितले. दिल्ली विधानसभा निवडणुका 2020 मध्ये होणार असल्याने, केजरीवाल सरकारकडून दिल्लीकरांना खुश करण्यासाठी एकापाठोपाठ एक घोषणा केल्या जात आहेत. या अगोदर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीकरांना 200 युनिटपर्यंतची वीज मोफत व 201 ते 400 युनिटपर्यंत वापर असलेल्या ग्राहकांना वीज बिलावर 50% अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. सलग पाचव्या वर्षी वीज बिल दरात कोणतीही वाढ केलेली नाही. विशेष म्हणजे आम आदमी पार्टीने 2015 मधील विधानसभा निवडणुकीवेळी महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आणि मोफत वायफायची सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. आता या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी दिल्ली सरकारने दोन टप्प्यात 70 हजार राउटर व 2.8 लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 1.4 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत.

हाशिम आमलाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती :

दक्षिण आफ्रिकेचा शैलीदार फलंदाज हाशिम आमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आमलाने अचानक घेतलेल्या या निर्णयाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, प्रथमश्रेणी क्रिकेट तसेच T-20 लीगमध्ये आमला यापुढेही खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांमध्ये आमलाचं नाव घेतलं जातं. आमलाने दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना 124 कसोटी सामन्यांत 9 हजार 282 धावा केल्या आहेत. कसोटीत त्रिशतक झळकावणारा तो दक्षिण आफ्रिकेचा एकमेव फलंदाज आहे. वनडेतही आमलाने आपल्या संघासाठी चमकदार कामगिरी केली. 181 वनडेत 8 हजार 113 धावा आमलाच्या नावावर आहेत. आमलाने कसोटीत 28 आणि वनडेत 27 अशी मिळून 55 शतके झळकावली. T-20 क्रिकेटमध्येही त्याची बॅट तळपली. 44 T-20 सामन्यांत त्याने 1 हजार 277 धावा केल्या. 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत आमलाने 349 सामने खेळून 18 हजार धावा केल्या. 36 वर्षीय आमलाने डिसेंबर 2004 मध्ये भारताविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. 2008 मध्ये त्याने वनडेत पदार्पण केले होते. निवृत्तीचा निर्णय घेत असताना नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या चाहत्यांचे आमलाने आभार मानले आहेत.

मेनलॅन्ड ते अँनाकापा पोहणारा प्रभात ठरला पहिला आशियाई जलतरणपटू :

कॅलिफोर्नियातील सांताबारबारा येथील मेनलॅन्ड ते अँनाकापा हे प्रशांत महासागरातील 20 किलोमीटरचे सागरी अंतर यशस्वीरीत्या पोहून पार करणारा मुंबईकर प्रभात कोळी हा आशिया आणि भारतातील पहिला जलतरणपटू ठरला आहे. आतापर्यँत जगभरातील केवळ 14 जलतरणपटूनी अशी कामगिरी साधली आहे. चेंबूरच्या बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या प्रभातने सातव्या क्रमांकाची वेळ नोंदवली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेकरता प्रशांत महासागरात सराव करत असताना प्रभातचा डावा खांदा दुखावला होता. पण या दुखण्यावर मात करत प्रभातने यशावर शिक्कमोर्तब केले. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 3 जुलै रोजी प्रभातने अँनाकापा ते मेनलॅन्ड हे 20 किलोमीटरचे अंतर पोहण्यास सुरुवात केली. पण या मार्गात असलेल्या तेलाच्या विहरीतील निघालेला तेलाचा तवंग पाण्यावर पसरला होता. सुमारे 8 किलोमीटरचे अंतर पोहून गेल्यावर पाण्यावर पसरलेल्या तेलाचा प्रभातला खूप त्रास झाला. पोहत असताना अवघ्या 15 मिनिटाच्या कालावधीत प्रभातला वारंवार उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे पुढचा धोका टाळण्यासाठी प्रभातने पाण्याबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या अपयशामुळे नाउमेद न होता 10 जुलै रोजी प्रभात मेनलॅन्ड ते अँनाकापा हे उलट अंतर पोहण्यासाठी पाण्यात उतरला आणि त्यात यशही मिळवले. यावेळी पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध पोहायला लागल्याने प्रभातला अपेक्षित वेळ साधता आली नाही. साधरणतः; चार फुटाची लाट आणि 13 अंश सेल्सिअस पाण्याचे तापमान असताना प्रभातने 20 किलोमीटरचे अंतर 6 तास 20 मिनिटामध्ये पोहून पार केले.

शिधापत्रिकांच्या आंतरराज्य जोडणीस प्रारंभ :

‘एक देश-एक शिधापत्रिका’ योजना 1 जून,2020 पर्यंत देशभरात पूर्णपणे लागू होईल, असे केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पास्वान यांनी सांगितले. तेलंगण-आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमध्ये शिधापत्रिकांच्या आंतरराज्य जोडणीची सुरुवात शुक्रवारी करण्यात आली. याचा अर्थ तेलंगण व आंध्र प्रदेश येथे राहणारे शिधापत्रिकाधारक लोक दोन्ही राज्यात स्वस्त धान्य दुकानात खरेदी करू शकतील. तसेच महाराष्ट्र व गुजरात या राज्यातील लोक दोन्हीकडे स्वस्त धान्य दुकानातून खरेदी करू शकतील. हरयाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, पंजाब, राजस्थान, त्रिपुरा या राज्यांमध्ये या योजनेचे काम सुरू आहे. अन्न खात्याचे सचिव रवीकांत यांनी सांगितले की, शिधापत्रिकांची आंतरराज्य व्यवस्था जानेवारी 2020 पर्यंतपूर्ण होईल अकरा राज्यात एकच संजाल असेल त्यात 11 राज्यातील लोक कुठूनही शिधा खरेदी करू शकतील. एक देश एक शिधापत्रिका योजना 1 जून, 2020 पर्यंत देशात लागू करण्याचा विचार आहे.

देशात लवकरच धावणार पहिली अंडरवॉटर ट्रेन :

देशात रेल्वेचे जाळे एवढ्या वेगाने विस्तारत असताना आता देशातील नागरिकांना आता एक रोमांचकारी अनुभव घेता येणार आहे. हा अनुभव नागरिकांना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येणार आहे. कारण देशात पहिली अंडरवॉटर ट्रेन म्हणजेच पाण्याखालून जाणारी रेल्वे लवकरच धावणार आहे. कोलकात्यातील हुगळी नदीखालून ही ट्रेन धावणार आहे. रेल्वे लाईन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. देशातील पहिली पाण्याखालून धावणारी ट्रेन सॉल्टलेक सेक्‍टर 5 ते हावडा मैदानापर्यंत धावण्यासाठी जवळपास तयार झाली आहे. तसेच हा रेल्वेमार्ग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. त्यातील पहिला टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला केला जाणार असल्याचे यात सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोलकात्यातील प्रवाशांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. या ट्रेनला पाण्यापासून वाचवण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा कवच लावण्यात आले आहे. तसेच नदीच्या मधून जाणारा हा मार्ग 520 मीटर लांब आणि 30 मीटर खोल आहे. नदीखालून ट्रेनला हे अंतर पार करण्यासाठी 60 सेकंदाचा वेळ लागणार आहे. ही ट्रेन लवकरच सुरू होणार असून हे उत्तम इंजिनिअरिंगचे प्रतिक असल्याचे पीयूष गोयल म्हणाले.