चालू घडामोडी – 10 ऑगस्ट, 2019

0
29

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
चला बघूया आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी, तेही फक्त 5 मिनटात !!!
या चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी नवाब मलिक यांची निवड :

माजी मंत्री सचिन अहिर यांच्या पक्षांतरामुळं रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी पक्षाचे प्रवक्ते व माजी मंत्री नवाब मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली. कुर्ला-अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असलेले नवाब मलिक हे सध्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. माध्यमांतून ते पक्षाची बाजू अतिशय समर्थपणे मांडत असतात. यापूर्वी त्यांनी पक्षाच्या मुंबई शाखेचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. उत्तर भारतीय असूनही मराठी भाषेवर त्यांची चांगली पकड आहे. मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांना पक्षाशी जोडून घेण्यास त्यांची मदत होऊ शकते, असा पक्षाचा होरा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाचा मलिक यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीला विरोध असल्याची चर्चा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. मलिक यांच्याइतका सक्षम चेहरा मुंबईत नसल्याचं कारणही त्यांच्या नियुक्तीमागे असल्याचं बोललं जात आहे.

जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक 2019 – राष्ट्रपतींची अनुच्छेद 370 च्या तरतुदी रद्द करण्यास मान्यता :

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणार्‍या घटनेच्या अनुच्छेद 370 च्या तरतुदी रद्दबातल करण्याच्या विधेयकावर राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सही केली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांने त्याच संदर्भात ठराव मंजूर केल्यानंतर हे पाऊल उचलले गेले. तत्पूर्वी, सरकारने जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक 2019 ला लोकसभेत विचार करण्यासाठी आणि मंजुरीसाठी 6 ऑगस्ट, 2019 रोजी पाठवले होते. लोकसभेने 270 मतांच्या बाजूने हे विधेयक संमत करून बहुमताने मंजूर केले. यासह सर्वसाधारण प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) साठी 10% आरक्षणाच्या तरतुदी देखील सभागृहात मंजूर करण्यात आल्या. राज्यसभेत बोलतांना गृहमंत्री अमित शहा यांनी सदस्यांना आश्वासन दिले होते की हे विधेयक आणि ठरावाची सभागृहाच्या विचाराधीन चर्चा नक्की करण्यात येईल. त्याच विधेयकावर विरोधी पक्षांवर सविस्तर चर्चा होऊ शकते आणि ते उत्तर देण्यास तयार आहेत, असेही गृहमंत्री म्हणाले होते.

कसोटी क्रमवारीत स्मिथ तिसऱ्या स्थानी :

इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतके झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत भारताच्या चेतेश्वर पुजाराला पिछाडीवर सोडत तिसऱ्या स्थानी दाखल झाला आहे. त्याचे 900 गुण झाले आहेत. विराट (922 गुण), केन विल्यमसन (913 गुण) यांच्यानंतर तो तिसऱ्या स्थानी आहे. या कसोटीपुर्वी त्याचे 857 गुण होते. भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी कायम आहे तर पुजाराची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. चेंडू छेडखानी प्रकरणात एक वर्षाच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे गेल्यानंतर पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या स्मिथने 144 व 142 धावांची खेळी केली. तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. कसोटी सामन्यात 9 बळी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियोनने सहा स्थानांची प्रगती करीत 13 वे स्थान गाठले आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सामन्यात सात बळी घेत अव्वल स्थान अधिक मजबूत केले आहे. तो कारकीर्दीतील सर्वोत्तम 898 गुणांवर पोहोचला आहे.

पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले, भारतीय उच्चायुक्तांना परत पाठवणार :

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद 370 रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे. पाकिस्तानने भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे तसेच राजनैतिक संबंधांचा स्तरही घटवणार असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान आपल्या उच्चायुक्तांना भारतात पाठवणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानने भारतासाठी नियुक्त केलेले उच्चायुक्त या महिन्यात पदभार संभाळणार होते. त्याचवेळी भारताचे उच्चायुक्त अजय बिसारीया यांना पाकिस्तान सोडण्यास सांगितले आहे. 7 ऑगस्ट, 2019 रोजी झालेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताने अनुच्छेद 370 हटवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाकिस्तानी लष्कराला नियंत्रण रेषेवर सर्तक राहण्याचेही निर्देश दिले आहेत. इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पाकिस्तानचे लष्करी अधिकारीही उपस्थित होते.

विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी यांना ‘चित्रभूषण’ :

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा ‘चित्रभूषण’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सुषमा शिरोमणी, तसेच ज्येष्ठ कलादिग्दर्शक श्रीकांत धोंगडे व निर्माते किशोर मिस्कीन यांना जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ आणि 51,000 हजार रुपये रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी, 19 ऑगस्टला करण्यात येईल. चित्रपट क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारे ‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार 7 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे जाहीर करण्यात आले. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी याची घोषणा व पुरस्काराची माहिती यावेळी दिली. रमेश साळगांवकर, संजीव नाईक, विलास उजवणे, अप्पा वढावकर, नरेंद्र पंडित, प्रशांत पाताडे, दीपक विरकूड, विलास रानडे, विनय मांडके, जयवंत राऊत, सतीश पुळेकर, प्रेमाकिरण, सविता मालपेकर, चेतन दळवी, अच्युत ठाकूर, वसंत इंगळे या कलाकर्मींना ‘चित्रकर्मी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ आणि 11,000 रुपये रोख रक्कम असे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमासाठी उदयोन्मुख कलाकारांना या वेळी सादरीकरणाची संधी मंडळातर्फे देण्यात येणार आहे.