चालू घडामोडी – 04 जुलै, 2019

0
41

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
चला बघूया आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी, तेही फक्त 5 मिनटात !!!
या चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.

‘जीएसटी’मध्ये नवीन सुधारणांची घोषणा :

वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीस दोन वर्षे पूर्ण होत असताना अर्थ मंत्रालयाने या अप्रत्यक्ष कर पद्धतीत काही सुधारणा करण्याचे ठरवले आहे. नवीन विवरणपत्र पद्धत, रोख खतावणी पद्धतीत सुसूत्रता, एकच कर परतावा वितरण प्रणाली यांचा त्यात समावेश असून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ व कंपनी कामकाज राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी विविध खात्यांचे सचिव व अधिकारी यांची बैठक घेऊन जीएसटी द्विवर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानही भूषविले. भारतीय अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी पद्धतीमुळे आमूलाग्र बदल झाले असून बहुस्तरीय करपद्धत, गुंतागुंतीची अप्रत्यक्ष कररचना यांची जागा साध्या, पारदर्शक, तंत्रज्ञानस्नेही करप्रणालीने घेतली आहे. 1 जुलै पासून प्रायोगिक तत्त्वावर नवीन करविवरणपत्र प्रणाली राबवली जात आहे व ती 1 ऑक्टोबरपासून अनिवार्य करण्यात येईल. छोटय़ा कर दात्यांसाठी ‘सहज’ व ‘सुगम’ विवरणपत्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. रोख खतावणीत बदल करताना सुसूत्रीकरण करण्यात येत असून त्यात वीस अर्थशीर्षांऐवजी आता पाच प्रमुख अर्थ शीर्ष राहणार आहेत. कर, व्याज, दंड, शुल्क व इतर बाबींसाठी एकच रोख खतावणी यापुढे राहील. एकच कर परतावा वितरण प्रणाली अमलात येणार असून त्यात केंद्रीय जीएसटी, राज्य जीएसटी व एकात्मिक जीएसटी तसेच उपकर यांचा वेगवेगळा परतावा सध्या सरकार मंजूर करीत असते, त्या ऐवजी एकत्रित परताव्याचा विचार केला जात आहे.

विश्वचषक 2019 : शमीचा भेदक मारा, आफ्रिदीनंतर अनोखी कामगिरी करणारा दुसरा गोलंदाज

विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने 337 धावांपर्यंत मजल मारली. मात्र भुवनेश्वर कुमारच्या जागी संघात संधी मिळालेल्या मोहम्मद शमीने आपली चमक पुन्हा एकदा दाखवून दिली. शमीने इंग्लंडचा निम्मा संघ बाद करत, अनोखी कामगिरी केली आहे. विश्वचषक स्पर्धेत सलग सामन्यांमध्ये 4 बळी घेणारा शमी दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीने अशी कामगिरी करुन दाखवली होती. याचसोबत वन-डे क्रिकेटमध्ये सलग सामन्यात 4 बळी घेणारा शमी दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी नरेंद्र हिरवाणी यांनी 1988 साली अशी कामगिरी करुन दाखवली होती. मोहम्मद शमीने 10 षटकात 69 धावात 5 बळी घेतले, यात शमीने 1 षटक निर्धावही टाकलं. शमीने इंग्लंडविरुद्ध जॉनी बेअरस्टो, जो रुट, इयॉन मॉर्गन, जोस बटलर आणि ख्रिस वोक्सला बाद केलं.

राज्यसभेतही जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट वाढीचा प्रस्ताव मंजूर :

जोरदार चर्चेअंती अखेस 1 जुलैला राज्यसभेत देखील जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीचा कालावधी सहा महिन्यांसाठी वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. याबरोबरच जम्मू-काश्मीर आरक्षण (सुधारणा) विधेयक, 2019 ला देखील मंजुरी मिळाली. गृहमंत्री अमित शाह यांनी हे दोन्ही प्रस्ताव राज्यसभेत मांडले होते. खरेतर राज्यसभेत सरकारचे बहुमत नव्हते व लोकसभेत या प्रस्तावास काँग्रेससह अन्य विरोधकांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे राज्यसभेत याला मंजुरी मिळण्याची शक्यता कमी वाटत होती. मात्र, राज्यसभेतही हे दोन्ही विधेयक पारीत झाल्याने आता जम्मू-काश्मीरमध्ये 3 जुलै पासून पुढे सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू झाले आहे.

जपानकडून स्मार्टफोनच्या सुटय़ा भागांची दक्षिण कोरियाला होणारी निर्यात बंद :

युद्धकाळात जपानच्या काही कंपन्यांनी कोरियाच्या लोकांना सक्तीने कंपन्यात काम करायला लावल्याच्या प्रकरणातील जुना वाद चिघळला असून जपानने दक्षिण कोरियाला चिप, स्मार्टफोन सुटे भाग यांची निर्यात बंद केली आहे. 4 जुलैपासून हा निर्णय अमलात येत आहे. ही बातमी येताच सॅमसंगचा शेअर 0.74 टक्के तर एलजीचा 2.52 टक्क्य़ांनी घसरला आहे. इलेक्ट्रॉनिक व मोबाईल सुटे भाग तयार करणाऱ्या जपानी कंपन्यांचे शेअरही घसरले आहेत. दक्षिण कोरियाच्या न्यायालयांनी युद्धकाळात ज्या जपानी कंपन्यांनी कोरियन लोकांकडून सक्तीने काम करवून घेतले त्यांनी नुकसान भरपाई द्यावी असा निकाल दिला असून जपानने मात्र हा प्रश्न दशकापूर्वीच दोन्ही देशात राजनैतिक संबंध सुरू होताना संपला होता असा दावा केला आहे. जपानच्या आर्थिक, व्यापार व उद्योग मंत्रालयाने सांगितले, की दक्षिण कोरियाला काही महत्त्वाच्या भागांची निर्यात थांबवण्याचा निर्णय हा आंतरराष्ट्रीय संबंधांना अनुसरूनच घेतला आहे.

‘व्हॉट्सअ‍ॅप’मुळे मानसिक आरोग्याला फायदा :

समाजमाध्यमांवर विशेष करून व्हॉट्सअ‍ॅपवर जे लोक जास्त वेळ घालवतात त्यांना एकटेपणा कमी जाणवतो व त्यांचा आत्मसन्मान वाढतो असा दावा अभ्यासात करण्यात आला आहे. ब्रिटनमधील एज हिल विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, जी उपयोजने (अ‍ॅप) गद्य संदेशावर आधारित आहेत त्यांचा मानसिक अवस्थेवर चांगला परिणाम होतो. व्हॉट्सअ‍ॅपवर लोक जितका जास्त वेळ घालवतात तितके त्यांना मित्र व कुटुंबासमवेत असल्यासारखे वाटते त्यांना ते आभासी नातेसंबंध चांगल्या दर्जाचे वाटतात. यातील व्हॉट्सअ‍ॅप समूहात लोक नाते व मैत्रीत बांधले जातात. त्यामुळे त्यांचा आत्मसन्मान व सामाजिक सक्षमता वाढते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ ह्य़ूमन कॉम्प्युटर स्टडीज या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. अभ्यास केलेले लोक साधारणपणे रोज पंचावन्न मिनिटे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करीत होते, व्हॉट्सअ‍ॅपची लोकप्रियता व त्यातील गप्पांची सोय यामुळे त्याचा वापर एकूणच समाजात जास्त आहे. व्हॉट्सअ‍ॅप समूहात नाव जोडलेले असणे
व त्यावर सतत सक्रियता यामुळे संबंधितांना एकटे वाटत नाही. ते सतत निकटच्या मित्रांशी आभासी पद्धतीने जोडलेले राहतात.