गुजरातमध्ये वाघेलांची जनविकल्प आघाडी

0
18

अहमदाबाद -कॉंग्रेसला रामराम ठोकणारे गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला नव्या राजकीय आघाडीचे नेतृत्व करणार आहेत. जन विकल्प असे या आघाडीचे नाव आहे.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला नव्या राजकीय आघाडीचे नेतृत्व करणार आहेत. जन विकल्प असे या आघाडीचे नाव आहे. ही आघाडी चालू वर्षीच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुजरातमधील सर्व जागा लढवणार आहे.

आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत 77 वर्षीय वाघेला यांनी स्वत:च त्यांच्या बहुप्रतीक्षित राजकीय वाढचालीची माहिती दिली. वाघेला यांनी 1995 मध्ये भाजपमध्ये बाहेर पडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आगामी निवडणुकीसाठी स्वत:चे नाव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्यास कॉंग्रेसने अनुत्सुकता दर्शवल्याने नाराज झालेल्या वाघेला यांनी काही दिवसांपूर्वी त्या पक्षाचा हात सोडला. त्यानंतर ते स्वगृही (भाजप) परततील, अशी जोरदार शक्‍यता होती. मात्र, सर्व चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी आघाडीचा पर्याय निवडला. अहमदाबादमधील काही व्यावसायिकांनी जन विकल्प आघाडी स्थापन केली. भाजप आणि कॉंग्रेसला पर्याय देण्यासाठी आघाडीचे नेतृत्व करण्याची त्यांची विनंती मी मान्य केली, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्रिपदाची आकांक्षा कायम असल्याचे संकेत दिले. अनेकांना मी मुख्यमंत्रिपदी हवा आहे, असा दावा त्यांनी केला.

गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. त्या सर्व जागा वाघेला यांच्या नेतृत्वाखालील आघाडी लढवणार आहे. जन विकल्प हा पक्ष नसून आघाडी आहे. ही आघाडी व्यवस्थेवर नाराज असणाऱ्या लोकांचा आवाज बनेल. शेतकरी, महिला, व्यापारी, बेरोजगार युवकांचे मुद्दे आघाडी मांडेल, अशी ग्वाही वाघेला यांनी दिली. स्वत: विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.

वाघेला यांचा राजकीय दबदबा आणि जनाधार पाहता जन विकल्प आघाडीमुळे गुजरातमधील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपने याआधीच गुजरातमधील निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीला यंदा चौरंगी लढतीचे स्वरूप प्राप्त होणार आहे. पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी अजून त्यांचे पत्ते खोललेले नाहीत. हार्दिक यांनी त्यांची भूमिका निश्‍चित केल्यावर गुजरातमधील राजकीय रंगत आणखीच वाढणार आहे.