गांधीजींना मिळणार अमेरिकेचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार

0
355

अमेरिकेचे नागरिकत्व मिळालेल्या चार भारतीयांसह अमेरिकेच्या काही खासदारांनी महात्मा गांधींना मरणोत्तर प्रतिष्ठित ‘काँग्रेसनल गोल्ड मेडल’ या पुरस्काराने सन्मानित करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या काँग्रेसमधील (संसदेत) प्रतिनिधी सभेमध्ये सादर केला आहे. यावेळी शांती आणि अहिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या महात्मा गांधींना ‘काँग्रेसनल गोल्ड मेडलने’ सन्मानित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

अमेरिकन काँग्रेसच्या सदस्या कैरोलिन मलोनी यांनी २३ सप्टेंबर रोजी प्रतिनिधी सभेत यांसदर्भातील प्रस्ताव क्र. एचआर ६९१६ सादर केला होता. याला भारतीय वंशाचे चार खासदार एमी बेरा, राजा कृष्णमुर्ती, रो खन्ना आणि प्रमिला जयपाल यांनी समर्थन दिले. त्याचबरोबर संसदीय कॉक्सच्या विद्यमान सहअध्यक्ष तुलसी गबार्ड यांनी देखील या प्रस्तावाला आपले समर्थन दिले. हा प्रस्ताव वित्तीय सेवा समिती आणि सभागृहाच्या प्रशासकीय समितीकडे पाठवण्यात आला आहे.

काँग्रेसनल गोल्ड मेडल’ अमेरिकन काँग्रेसच्यावतीने देण्यात येणारा सर्वोच्च नागरिक सन्मान आहे. या सन्मानाने आत्तापर्यंत अगदी मोजक्याच बिगर अमेरिकन लोकांना गौरविण्यात आले आहे. यामध्ये मदर तेरेसा (१९९७), नेल्सन मंडेला (१९९८), पोप जॉन पॉल द्वीतीय (२०००), दलाई लामा (२००६), आंग सान सू ची (२००८), मुहम्मद युनूस (२०१०) तर शिमोन पेरेज (२०१४) यांचा समावेश आहे.

ऑगस्ट महिन्यात न्यूयॉर्कमध्ये झालेल्या लोकप्रिय ‘इंडिया के परेड’ या कार्यक्रमात मलोनी यांनी या प्रस्तावाची घोषणा केली होती. त्यांनी म्हटले होते, महात्मा गांधींच्या इंग्रजांविरोधातील अहिंसक ऐतिहासिक आंदोलनामुळे एका देशाला आणि संपूर्ण जगाला प्रेरित केले होते. त्यांचे हे उदाहरण आम्हालाही दुसऱ्यांची मदत करण्यासाठी प्रोत्साहित करते.