कॅव्हानॉघ यांनी स्वीकारली न्यायाधीशपदाची सूत्रे

0
207

निदर्शने, ताणतणाव आणि नाट्यमय घटामोडींच्या पार्श्वभूमीवर ब्रेट कॅव्हानॉघ यांनी आज अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारली. वादग्रस्त ठरलेले कॅव्हानॉघ यांच्यावर तीन महिलांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे कॅव्हानॉघ यांची निवड वादात सापडली होती.

कॅपिटॉल हिलमध्ये पार पडलेल्या समारंभात सरन्यायाधीश जॉन रॉबर्टस यांनी कॅव्हानॉघ यांना पदाची शपथ दिली. कॅव्हानाघ हे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे 114वे न्यायाधीश ठरले आहेत. या शपथविधीप्रसंगी कॅव्हानाघ यांचे कुटुंबीय उपस्थित होते. तत्पूर्वी सिनेटमध्ये झालेल्या मतविभाजनामध्ये कॅव्हानाघ यांच्या बाजूने 50, तर विरोधात 48 मते पडली. 

कॅव्हानाघ यांची निवड जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांमुळे ते अडचणीत आले होते. या निवडीवरून सत्ताधारी रिपब्लिकन आणि विरोधी पक्षातील डेमोक्रॅटिक सदस्यांमध्ये आरोपांच्या फैरी झडल्या होत्या. त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव निर्माण झाल्यानंतर कॅव्हानाघ यांच्याविरोधातील आरोपांची एफबीआयकडून चौकशी करण्याचे आदेश अध्यक्ष ट्रम्प यांनी दिले होते.