ऑस्ट्रेलियात धावणार ‘मेक इन इंडिया’ मेट्रो

0
22

भारतातील उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ योजनेची सुरूवात केली होती. ‘मेक इन इंडिया’ योजनेला आता उत्तम प्रतिसाद मिळत असून ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये भारतात तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक मेट्रो धावणार आहेत. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.

• गेल्या काही वर्षांमध्ये भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्यातच ‘मेक इन इंडिया’ या योजनेमुळे भारतातील उत्पादन क्षेत्रालाही मोठी चालना मिळाली आहे.
• देशांतर्गत आणि परदेशी कंपन्यांद्वारे देशातील उत्पादन क्षेत्राला चालना मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.
• त्यातच आता या योजनेला मोठे यश मिळाले असून भारतात तयार करण्यात आलेली मेट्रो ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये धावणार आहे.
• सिडनीत पहिल्यांदाच चालक विरहित मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. या मेट्रोमध्ये 6 कोचेस देण्यात आले असून 22 अॅल्सटॉम ट्रेनद्वारे ही सेवा पुरवली जाणार आहे.
• तल्लावांग मेट्रो स्टेशन ते वेस्टवूड स्थानकादरम्यान ही मेट्रो सेवा चालवण्यात येईल.
• तल्लावांग ते वेस्टवूडदरम्यान एकूण 13 मेट्रो स्थानके असतील.
• सिडनी मेट्रोसाठी ‘अॅल्सटॉम एसए’ या भारतीय कंपनीने 22 मेट्रो ट्रेन तयार केल्या आहेत.
• या ट्रेन आंध्र प्रदेशात असेंबल करण्यात आल्या असून त्या पूर्णत: स्वयंचलित आहे. यामध्ये एलईडी लाइट, आपात्कालिन इंटरकॉम आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
• तसेच ‘एल्सटॉम एसए’ने सिग्नलिंग सिस्टम आणि मेट्रो चालवण्यासाठी सिडनी मेट्रोसोबत 15 वर्षांचा करार केला आहे.
• स्वदेशी बनावटीच्या असलेल्या Train 18 च्या कोचेसची आता अन्य देशांनाही विक्री करण्यात येणार असल्याची माहिती यापूर्वीच देण्यात आली होती.
• दक्षिण आशियाई आणि दक्षिण अमेरिकन देश या ट्रेनच्या खरेदीसाठी सकारात्मक असल्याचेही सांगण्यात आले होते. भारतीय रेल्वे याबाबत एक योजना तयार करत असून या ट्रेनच्या कोचची देशातील मागणी पूर्ण झाल्यानंतरच अन्य देशांना कोचेस तयार करून देण्यात येणार आहेत.