एम नागेश्वर राव यांची सीबीआयचे प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती

0
170

केंद्र सरकारने कडक पाऊलं उचलत सीबीआय प्रमुख आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. आलोक वर्मा यांच्या जागी एम नागेश्वर राव यांच्याकडे सीबीआय प्रभारी संचालकपद सोपवण्यात आलं आहे. 1986 च्या बॅचमधील ओडिशा कॅडरचे आयपीएस अधिकारी राव तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्याचे रहिवासी आहेत.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या विशेष पथकाने आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्या कार्यालयात छापेमारी केली असून 10 आणि 11 मजला सील केला आहे.

केंद्र सरकारने यासंबंधी आदेश जारी करत तात्काळ स्वरुपात आलोक वर्मा यांच्या जागी एम नागेश्वर राव यांची नियुक्ती केली आहे. महत्त्वाचं म्हणजे विशेष संचालक अस्थाना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एफआयआरमध्ये मांस निर्यातदार मोईन कुरेशी याच्याडून तीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात कॅडरचे पोलीस अधिकारी अस्थाना यांची सीबीआयवर थेट नियुक्ती केली. त्या नियुक्तीला संचालक आलोक कुमार वर्मा आणि सहसंचालक ए. के. शर्मा यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. मात्र तरीही ही नियुक्ती झाली.