उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबार्इ चौधरींचं नाव

0
49

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचा निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आला. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत ही मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची घोषणा केली.

जीवनाचे तत्वज्ञान सहज, साेप्या, सरळ शब्दात कविता व अाेव्यांमधून व्यक्त करणाऱ्या खान्देशातील कवयित्री बहिणाबाई चाैधरी यांचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला देण्यात येणार अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत ही माहिती दिली. 

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा , १९८९ च्या अंतर्गत १५ ऑगस्ट, १९९० रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना  झाली. १९९१-९२ च्या दरम्यान विद्यापीठाने आपल्या प्रत्यक्ष वाटचालीस प्रा. एन. के. ठाकरे, प्रथम कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक व प्रशासकीय कार्याची सुरुवात केली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात जळगाव, धुळे व नंदुरबार हे तीन जिल्हे . आपल्या स्वतःच्या जागेत विद्यापीठाने १९९५ रोजी स्थानांतरण केले. गिरणा नदीच्या किनार्‍यावर वसलेले हे विद्यापीठ ६५० एकरात टेकड्यांमध्ये वसलेले आहे. विद्यापीठातील प्रत्येक इमारत ही विद्यापीठाने स्वतः तयार केलेल्या डांबरी रस्त्याने जोडलेली आहे, तसेच आशियन महामार्ग क्र.४६ ने विद्यापीठ जळगाव शहराशी जोडल्या गेले आहे. विद्यापीठात येणा-जाण्याकरीता शहर बस सेवा व ऑटो रिक्षा उपलब्ध आहेत.परिसराचे सौंदर्य सुंदर हिरवळी व वृक्षांची लागवड करुन जोपासलेले आहे. दोन लाखांपेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात येवून त्याचे संवर्धन केले असून नैसर्गिक वातावरण व पर्यावरणाची जोपासना करण्यात आलेली आहे, याकरिता विद्यापीठास राज्य शासनाचा वनश्री पुरस्कार २००० साली प्राप्त झाला आहे. 

कवयित्री बहिणाबाई चौधरी

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जन्मगाव जळगावजवळील आसोदा हे आहे. लग्न झाल्यावर त्या सासरी अर्थात जळगावला आल्या. बहिणाबाई या स्वत: निरक्षर होत्या. मात्र त्यांच्याकडे प्रचंड मोठी प्रतिभाशक्ती होती. घरातील, शेतातील कामे करतांना काव्यात्मक स्वरुपात लेवा गणबोली आणि अहिराणी बोलीभाषेत त्यांनी निसर्गाचे, मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले. त्यांचे पुत्र, प्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी यांनी त्या लिहून ठेवल्या. एकदा आचार्य अत्रे यांना हस्तलिखित कविता दाखविल्यानंतर साध्या-सरळ बोलीभाषेत मांडलेले मानवी जीवनाचे सार समाजापुढे यायलाच हवे, असे अत्रे यांनी सांगितले. नंतर त्यांच्याच पुढाकाराने बहिणाबाई यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ५० कविता प्रकाशित झाल्या. अरे संसार संसार, अरे खोप्यामधी खोपा, मन वढाय वढाय.. सारख्या अनेक कविता अभ्यासक्रमात शिकविल्या जातात.