इरम हबीब बनणार पहिली काश्मिरी मुस्लीम महिला वैमानिक

0
352

तीस वर्षीय इरम हबीब ही वैमानिक बनणारी काश्मीरमधली पहिली मुस्लीम महिला ठरणार आहे. पुढील महिन्यात इरम खासगी विमान कंपनीत पायलट म्हणून रूजू होत आहे.
दोन वर्षांपूर्वी तन्वी रैना या काश्मिरी पंडित कुटुंबातील मुलीनं वैमानिक होत काश्मीरमधली पहिली महिला वैमानिक होण्याचा मान मिळवला होता. तर गेल्या वर्षी आयेषा अझीज या एकवीस वर्षीय तरूणीनं भारतातली सगळ्यात तरूण विद्यार्थी वैमानिक ठरण्याचा मान मिळवला होता.

इरमच्या वडिलांचा सरकारी रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणं पुरवण्याचा व्यवसाय आहे. ज्यावेळी इरम बारावीत होती त्यावेळीच तिनं वैमानिक होण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु तिच्या घरच्यांनी यास विरोध केला होता. काश्मीरमध्ये कधी कुठल्या मुलीनं वैमानिक होण्याचा प्रयत्न तरी केलाय का, असं तिला सांगण्यात आलं होतं. मात्र तिनं सहा वर्ष घरच्यांना पाठिंबा देण्याची गळ घातली व तिला त्यात यश आलं.

व्यावसायिक वैमानिकाचा परवाना मिळवण्यासाठी इरम सध्या दिल्लीमध्ये प्रशिक्षण घेत असून वैमानिकाचं प्रशिक्षण तिनं दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतील मयामी इथं घेतलेलं आहे. मी काश्मिरी मुस्लीम असूनही वैमानिक होतेय म्हटल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता, परंतु काहीही झालं तरी मी माझं स्वप्न पूर्ण करण्याचा चंग बांधला होता, असं इरम सांगते. कमर्शियल पायलट लायसन्स मिळाल्यानंतर पुढील महिन्यात इरम खासगी विमानकंपनीत वैमानिक म्हणून रूजू होणार असल्याचे वृत्त आहे.