आयसीसी वनडे फलंदाजांच्या यादीत विराट अव्वलस्थानी

0
17

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी वनडे फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक रेटिंग पॉईंटच्या विक्रमाशी बरोबरी करत आपले अव्वलस्थान कायम राखले.

 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी वनडे फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक रेटिंग पॉईंटच्या विक्रमाशी बरोबरी करत आपले अव्वलस्थान कायम राखले असून याचवेळी जसप्रीत बुमराहचे मानांकन गोलंदाजांच्या यादीत चक्क २७ अंकांनी सुधारले असून या क्रमवारीत तो आता चौथ्या स्थानी झेपावला आहे. वनडे मालिकेत भारताने लंकेला ५-०असा व्हॉईटवॉश दिल्यानंतर एका दिवसाच्या अंतराने काल आयसीसीने ताजी मानांकन यादी जाहीर केली. प्रथम तीनमध्ये मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), इम्रान ताहिर (पाकिस्तान) आणि जोश हाझलवूड (ऑस्ट्रेलिया) यांचा समावेश आहे. 

 

विराट कोहली

हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणार्‍या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे. इएसपूएन च्या जगातील सर्वात जास्त विख्यात ॲथलीट्सच्या २०१६ च्या यादीत कोहलीचे नाव आठव्या क्रमांकावर आहे. इंडियन  प्रीमियर लीगच्या रॉयल चेलेंजर्स बंगलोर संघाकडून तो खेळतो, आणि २०१३ पासून तो संघाचा कर्णधार आहे.

कारकीर्द 

दिल्लीसाठी विविध वयोगटातील आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, विराट कोहलीने २००८ साली मलेशियामधील 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकासाठी खेळविल्या गेलेल्या सामन्यांमध्ये विजेत्या संघाचे कर्णधारपद भूषविले. त्यानंतर काही महिन्यातच म्हणजे ऑगस्ट २००८मध्ये, १९ वर्षांचा असताना त्याने भारताकडून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. कोहली आपला पहिला कसोटी सामना २०११ मध्ये डडवेस्ट इंडीझ़़ विरुद्ध किंगस्टन येथे खेळला. २०१२ मध्ये कोहलीची एकदिवसीय क्रिकेट मध्ये उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली. २०१४ मध्ये धोणीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर, कोहली भारतीय संघाचा कर्णधार झाला. 

विक्रम आणि पुरस्कार 

सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील बरेच विक्रम कोहलीच्या नावे आहेत. त्यांत सर्वात जलद शतक, सर्वात जलद ५००० धावा आणि सर्वात जलद १० शतके या विक्रमांचा समावेश आहे. सलग चार कॅलेंडर वर्षांत प्रत्येक वर्षी किमान १००० धावा करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज आहे. २०१५ मध्ये तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाजही झाला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये सर्वाधिक अर्धशतके (१६) करण्याचा विक्रम सुद्धा कोहलीच्या नावे आहे. कोहलीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांत आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू २०१२ आणि २०११-१२ व २०१४-१५ साठीचा बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेटरचा पुरस्कारसुद्धा समाविष्ट आहे. २०१३ मध्ये त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीसाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्पोर्ट्‌सप्रो (SportsPro), नावाच्या एका इंग्लंडच्या मासिकाने २०१४ मध्ये कोहलीला दुसरा सर्वात उल्लेखनीय खेळाडू म्हणून उल्लेखले आहे. तो आयएसएलच्या एफ.सी.गोवा आणि आयपीटीएलच्या यूएई रॉयल्सचा सह-मालक आहे.