आयसीसीच्या संचालकपदी इंद्रा नुयी

0
21

पेप्सिकोच्या प्रमुख इंद्रा नुयी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये इंडिपेंडंट डायरेक्टर (स्वतंत्र संचालक) म्हणून नियुक्‍ती करण्यात आली असून संचालकपदावर नियुक्‍त झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत.

# आयसीसीत स्वतंत्र संचालकाची नियुक्‍ती करण्याचा निर्णय जून 2017 मध्ये घेण्यात आला होता. आयसीसीने या पदावर इंद्रा नुयी यांची निवड केली आहे. जून 2018 मध्ये त्या पदभार स्वीकारतील.

# इंद्रा नुयी या पदावर विराजमान होणार्‍या पहिल्या महिला, तसेच पहिल्या स्वतंत्र संचालक आहेत. फॉर्च्युन मासिकाने जगातील शक्‍तिशाली महिलांच्या यादीत इंद्रा नुयी यांचा समावेश केला आहे.

इंद्रा नुयी :

इंद्रा नुयी यांचा जन्म चेन्नईत झाला असून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेत घेतले. यानंतर त्यांनी कोलकात्यातील आयआयएममधून शिक्षण घेतले आणि भारतातच करियरचा श्रीगणेशा केला. भारतात काही वर्ष काम केल्यानंतर त्या पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या. १९९४ मध्ये त्या पेप्सिकोत रुजू झाल्या. २००४ मध्ये त्यांनी कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. यानंतर २००६ मध्ये त्यांची कंपनीच्या सीईओपदी नियुक्ती झाली. २००७ मध्ये त्यांना प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) :

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद हे जगभरात क्रिकेट स्पर्धांचे नियंत्रक व नियामक मंडळ आहे. स्पर्धा आणि स्पर्धेचे आयोजन करण्याबरोबरच, ते प्रत्येक वर्षी क्रिकेटमधील त्यांच्या क्षेत्रातील यशस्वी खेळाडूंना व संघांना पुरस्कार देतात. खेळाडू तसेच संघाचे रेन्किंग काढते. आयसीसीमध्ये 106 सदस्य आहेत.