अविश्वास ठरावाचा इतिहास काय ?

0
23

No Confidence Motion in Lok sabha: लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. २००३ नंतर पहिल्यांदाच संसदेत अविश्वास ठराव मांडला जाणार असून या पार्श्वभूमीवर अविश्वास प्रस्तावाच्या इतिहासाचा घेतलेला आढावा…

आजपर्यंत अविश्वास ठराव किती वेळा मांडला?
आत्तापर्यंत लोकसभेत एकूण २६ वेळा अविश्वास प्रस्ताव सादर झाला आहे. शुक्रवारी मोदी सरकारविरोधातील प्रस्ताव सभागृहात चर्चेसाठी येताच हा आकडा २७ वर पोहोचणार आहे.

पहिला प्रस्ताव १९६३ मध्ये
समाजवादी नेते आचार्य कृपलानी यांनी १९६३ मध्ये पहिल्यांदा जवाहरलाल नेहरु सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील हा पहिला अविश्वास प्रस्ताव ठरला होता. हा प्रस्ताव ३४७ मतांनी फेटाळण्यात आला आणि नेहरु सरकारवर याचे परिणामदेखील झाले नव्हते. मात्र, पहिला प्रस्ताव म्हणून त्याची इतिहासात नोंद झाली.

सर्वाधिक प्रस्ताव कोणत्या सरकारविरोधात
सर्वाधिक अविश्वास प्रस्ताव इंदिरा गांधी सरकारविरोधात दाखल झाले होते. इंदिरा गांधी सरकारविरोधात १९६६ ते १९७५ या काळात १२ तर १९८१ ते १९८२ या काळात तीन वेळा अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला.

अविश्वास ठरावात सत्ताधाऱ्यांचा पराभव किती वेळा ?

अविश्वास प्रस्तावात आत्तापर्यंत तीन वेळा सत्ताधाऱ्यांचा पराभव झाला आणि त्यांना सत्ता सोडावी लागली. यात १९९० मध्ये व्ही. पी. सिंग सरकार, १९९७ मध्ये एच. डी. देवेगौडा सरकार आणि १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारचा पराभव झाला.

> ७ नोव्हेंबर १९९० मध्ये व्ही पी सिंग सरकारचा भाजपाने पाठिंबा काढून घेतला होता. शेवटी लोकसभेत अविश्वास ठरावात सरकारच्या बाजूने १५२ मते पडली आणि विरोधात ३५६ मते पडली. यामुळे सरकार कोसळले.

> ११ एप्रिल १९९७ मध्ये एच डी देवेगौडा यांचे सरकार कोसळले. देवेगौडा सरकारच्या बाजूने १९० तर विरोधात ३३८ मते पडली होती.

> १७ एप्रिल १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडले होते. सरकारच्या बाजूने २६९ तर विरोधात २७० मते होती.

शेवटचा अविश्वास प्रस्ताव कधी?
संसदेत शेवटचा अविश्वास प्रस्ताव २००३ मध्ये काँग्रेसच्या वतीने सोनिया गांधी यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारविरोधात मांडला होता. हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. त्यावेळी सरकारच्या बाजूने ३२५ तर विरोधात २१२ मते पडली होती.

अविश्वास प्रस्तावापूर्वीच राजीनामा
लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाने राजीनामा दिल्याचा प्रकारही घडला आहे. तीन वेळा हा प्रकार झाला आहे. १९७९ मध्ये काँग्रेस नेते वाय. व्ही. चाह्यान यांनी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाईंविरोधात ठराव मांडला. मात्र, यावर लोकसभेत चर्चा होण्यापूर्वीच देसाई यांनी राजीनामा दिला होता. १९७९ मध्ये चौधरी चरण सिंह आणि १९९६ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी अविश्वास प्रस्ताव मांडण्यापूर्वीच राजीनामा दिला होता.

पाच पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला
लोकसभेत १३ अविश्वास प्रस्तावांवर चर्चा झाली असून यातील पाच वेळा पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला.

काँग्रेसचा विश्वासदर्शक ठराव
२००८ मध्ये अमेरिकेशी अणूकरार करण्याच्या मुद्द्यांवरुन डाव्या पक्षांनी यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. यानंतर काँग्रेसने स्वत:हून संसदेत विश्वासदर्शक ठराव मांडला. हा ठराव काँग्रेस २६३ विरुद्ध २६९ मतांनी जिंकला होता.